"झाडामागे जाऊन कपडे बदलावे लागायचे...", प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला खुलासा; ४२ वा वाढदिवस करतेय साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:41 IST2024-12-09T12:05:59+5:302024-12-09T12:41:36+5:30
अभिनेत्रीने मुलाखतीत केलेला खुलासा

"झाडामागे जाऊन कपडे बदलावे लागायचे...", प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला खुलासा; ४२ वा वाढदिवस करतेय साजरा
बॉलिवूडची सुंदरी दिया मिर्झा (Dia Mirza) आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'रहना है तेरे दिल मे' सिनेमानंतर ती अनेकांची क्रश झाली. दियाने मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं. तिला इतर अभिनेत्रींप्रमाणे फारसं यश मिळू शकलं नाही. अभिनेत्रीने मुलाखतीत तेव्हा सिनेमांमध्ये काम करण्याचा अनुभाव सांगितला होता. व्हॅनिटी व्हॅन नसल्याने झाडामागे कपडे बदलावे लागायचे असा तिने खुलासा केला होता.
जुन्या आठवणींना उजाळा देताना दिया मिर्झा एका मुलाखतीत म्हणाली होती की, "मी इंडस्ट्रीत आले तेव्हा अभिनेतेच जास्त होते. तेव्हा सेटवर व्हॅनिटी व्हॅनही नसायच्या. अभिनेत्रींना कपडे बदलण्यासाठी झाडामागे किंवा मोठ्या दगडामागे जावं लागायचं. अनेकदा तर ज्युनिअर आर्टिस्ट साडी आणि चादर घेऊन उभ्या राहायच्या. त्यामागे आम्ही कपडे बदलायचो. इतकंच नाही तर आमच्यासाठी वॉशरुमचीही सुविधा नसायची."
यासोबतच दिया म्हणाली होती की, "तेव्हा अभिनेत्रींसोबत खूप भेदभाव व्हायचा. मी सुरुवातीला आले तेव्हा महिला खूपच कमी होत्या. त्यामुळे पावलोपावली भेदभाव होतोय अशी जाणीव व्हायची. प्रत्येक गोष्टीत वेगळी वागणूक मिळायची. अभिनेत्यांच्या व्हॅनिटी व्हॅनच्या तुलनेत अभिनेत्रींच्या व्हॅन छोट्या होत्या. आऊटडोर शूटिंगसाठी अभिनेत्रींना ना व्हॅन ना वॉशरुम कोणतीच सोय नव्हती. अभिनेत्री उशिरा आल्या तर आम्हाला अनप्रोफेशनलचा टॅग द्यायचे. हेच अभिनेते उशिरा आले तर त्यांना काहीच बोलायचे नाहीत. त्यांच्या उशिरा येण्याचा कोणालाच प्रॉब्लेम नसायचा."
दिया मिर्झाने २००१ साली 'रहना है तेरा दिल मे' सिनेमातून पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली. त्याआधी २००० साली तिने 'मिस इंडिया एशिया पॅसिफिक' चं विजेतेपद पटकावलं होतं.