'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवर राज्य! तीन दिवसात केला १०० कोटींचा बिझनेस, जाणून घ्या सिनेमाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:17 IST2025-12-08T11:10:04+5:302025-12-08T11:17:45+5:30
'धुरंधर' सिनेमाने तीन दिवसात चांगली कमाई केली आहे. वीकेंडला सिनेमाने केलेली कमाई वाचून थक्कच व्हाल

'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवर राज्य! तीन दिवसात केला १०० कोटींचा बिझनेस, जाणून घ्या सिनेमाची कमाई
'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर आपली जबरदस्त कामगिरी केली आहे. रणवीर सिंग, आर. माधवन, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षातील एक मोठा हिट चित्रपट ठरताना दिसत आहे.
संपूर्ण भारतात सुमारे ५,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये अवघ्या तीन दिवसांत १०० कोटी रुपयांचा विक्रमी आकडा पार केला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, 'धुरंधर'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) २८ कोटी रुपये, तर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) ३२ कोटी रुपयांची कमाई केली.
यानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी, या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली आणि चित्रपटाने तब्बल ४३ कोटी रुपये कमावले. या जबरदस्त कामगिरीमुळे 'धुरंधर'चे भारतातील एकूण कलेक्शन १०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. 'धुरंधर'ने परदेशातही चांगली कमाई केली असून, पहिल्या तीन दिवसांत जागतिक स्तरावर अंदाजे १३० ते १४० कोटी रुपयांपर्यंतचा गल्ला जमवला आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटाने अभिनेता रणवीर सिंगच्या पूर्वीच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'पद्मावत'चा रेकॉर्ड मोडला आहे. 'पद्मावत'ने पहिल्या तीन दिवसांत ८३ कोटी रुपये कमावले होते, परंतु 'धुरंधर'ने अवघ्या तीन दिवसांतच १०३ कोटींचा टप्पा पार करत रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक वीकेंड कमाईचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.