Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:13 IST2025-12-22T11:12:25+5:302025-12-22T11:13:32+5:30
केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवुडचे सिनेमेही 'धुरंधर'पुढे फिके पडताना दिसत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अवतार ३' सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'पुढे हात टेकले आहेत. या दोन्ही सिनेमांचं वीकेंड कलेक्शन समोर आलं आहे.

Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा
रणवीर सिंगचा 'धुरंधर' प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला आहे. 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं असून केवळ या सिनेमाचीच हवा पाहायला मिळत आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवुडचे सिनेमेही 'धुरंधर'पुढे फिके पडताना दिसत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अवतार ३' सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'पुढे हात टेकले आहेत. या दोन्ही सिनेमांचं वीकेंड कलेक्शन समोर आलं आहे.
'धुरंधर'च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण केलं असून वीकेंडलाही मजबूत कमाई केली आहे. तिसऱ्या शनिवारी 'धुरंधर'ने तब्बल ३४ कोटी तर रविवारी सुमारे ३८ कोटींचा गल्ला जमवला. वीकेंडला या सिनेमाने तब्बल ७२ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत भारतात 'धुरंधर'ने ५५६ कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. तर जगभरात ७९० कोटींचा टप्पा पार केला आहे.
'धुरंधर'च्या वादळात हॉलिवूडच्या 'अवतार'ची मात्र हवा टाइट झाल्याचं दिसत आहे. भारतात 'अवतार ३'ला हवा तसा प्रेक्षक वर्ग मिळत नाहीये. धुरंधरमुळे 'अवतार ३'ला बॉक्स ऑफिसवर जागा बनवणं कठीण जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'अवतार : फायर अँड अॅश'ने पहिल्या दिवशी १९ कोटींचा गल्ला जमवला. तर शनिवारी २२.२५ आणि रविवारी २५ कोटींपर्यंत या सिनेमाला कमाई करता आली. आत्तापर्यंत 'अवतार ३'ने भारतात ६६.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात मात्र अवतारने धुरंधरला मात देत तीनच दिवसात १२५० कोटी कमावले आहेत.