'धुरंधर' फेम अभिनेत्याने सिनेमावर होणाऱ्या टीकेला दिलं उत्तर, आदित्य धरबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:41 IST2025-12-12T12:39:39+5:302025-12-12T12:41:44+5:30
नुकतंच गौरवने सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

'धुरंधर' फेम अभिनेत्याने सिनेमावर होणाऱ्या टीकेला दिलं उत्तर, आदित्य धरबद्दल म्हणाला...
'धुरंधर' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने आतापर्यंत २०० कोटी पार गल्ला जमवला आहे. सिनेमात गौरव गेरा हा विनोदी अभिनेता ज्युस विक्रेत्याच्या भूमिकेत दिसला. गौरवला कोणीही ओळखू शकलं नाही. त्याच्या भूमिकेची, मेकअपची खूप चर्चा झाली. गौरवने सिनेमात स्पाय आणि अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली जो रणवीर सिंहची मदत करतो. आता नुकतंच गौरवने सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य धरबद्दल गौरव गेरा म्हणाला, "आदित्य खूप छान माणूस आहे. सेटवर तर तो एकदम शांततेत काम करायचा. तो बेस्ट माणूस आहे. एवढ्या मोठ्या स्केलवर सिनेमा बनवत असूनही त्याने कुठेही स्वत:वरचं नियंत्रण सोडलं नाही. तो एकदम शांत होता. तो फक्त एवढंच म्हणाला की, 'माझ्याकडे बेस्ट टीम आहे त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही'. त्याच्या याच वाक्याने सर्वांमध्ये आत्मविश्वास आला होता."
'धुरंधर'चं सगळीकडूनच कौतुक होत आहे. तर काहींनी सिनेमावर 'इस्लामोफोबिक' म्हणत टीकाही केली आहे. यावर गौरव म्हणाला, "मी अशा लोकांना हेच सांगेन की कृपया आधी सिनेमा बघा. मला एक सोशल मीडियावरची पोस्ट आठवतेय ज्यात असं म्हटलंय की धुरंधरने भारतीय सिनेमाची परिभाषाच बदलली. तेच मलाही आता इथे सांगावं वाटतंय. असे सिनेमे कधीतरीच येतात. आदित्य धर त्याच्या स्वतंत्र सिनेसृष्टीत असल्यासारखा आहे. मला अभिनेता म्हणून आणि प्रेक्षक म्हणूनही त्याचा अभिमान वाटतो."
'धुरंधर २' पुढील वर्षी १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा पहिल्या पार्टपेक्षाही आणखी दमदार असेल अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी दिली आहे.