'धुरंधर'मध्ये 'कसाब'ची भूमिका कुणी साकारली? अभिनयाची जोरदार चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:13 IST2025-12-11T17:11:47+5:302025-12-11T17:13:00+5:30
धुरंधर'मध्ये कसाबची भूमिका साकारून झाला व्हायरल! कोण आहे तो अभिनेता?

'धुरंधर'मध्ये 'कसाब'ची भूमिका कुणी साकारली? अभिनयाची जोरदार चर्चा!
२६ नोव्हेंबर २००८… ही तारीख कुणीही विसरू शकत नाही. तो दिवस फक्त मुंबईसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी काळा दिवस होता. समुद्रावाटे आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत थैमान घातला होता. ताज-ओबेरॉ हॉटेल, सीएसटी स्टेशनसह अनेक ठिकाणी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात शेकडो निष्पाप नागरिकांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेत १० पैकी ९ दहशतवाद्यांना जागीच ठार करण्यात आले, तर फक्त अजमल कसाब जिवंत पकडला गेला. दरम्यान, त्या दहशतवादी हल्ल्यावर आतापर्यंत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटातही या घटनेचा उल्लेख आहे. मात्र, यात हल्ल्यासह दहशतवाद्यांना प्रशिक्षण कुणी आणि कसं दिलं, हत्यार कुणी पुरवले, हल्ल्याची प्लानिंग कशी केली, याबाबतही माहिती दिली आहे.
'धुरंधर' या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा अभिनेता दलविंदर सैनी. दलविंदरची व्यक्तिरेखा पडद्यावर खूप कमी काळासाठी दिसते, पण, त्याचा दमदार अभिनय पाहून नेटकऱ्यांच्याही अंगावर काटा आला आहे.
दलविंदर सैनी हा छत्तीसगडमधील दुर्ग येथील रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचा जन्म मध्य प्रदेशातील सतना येथे झाला होता. कॉलेजच्या काळात त्याला रंगभूमीमध्ये रस निर्माण झाला आणि त्याने आयपीटीए भिलाईमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तो मुंबईत आला आणि रंगशीला थिएटर ग्रुपचा भाग बनला. यापूर्वी त्याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर अभिनीत 'परम सुंदरी' या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत काम केले होते.