धर्मेंद्र यांच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणार, निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, चाहत्यांना आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:54 IST2025-11-28T09:54:12+5:302025-11-28T09:54:51+5:30
धर्मेंद्र यांच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणारच! निर्मात्यांनीच केलं कन्फर्म, जाणून घ्या

धर्मेंद्र यांच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणार, निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, चाहत्यांना आनंद
धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानंतर, त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. एक देखणं, जिंदादिल व्यक्तिमत्व सोडून गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. अशातच धर्मेंद्र यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे. कोणता आहे हा सिनेमा? जाणून घ्या.
धर्मेंद्र यांच्या या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल लवकरच
धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांचा 'अपने' हा सिनेमा चांगलाच गाजला. अशातच धर्मेंद्र यांच्या निधनामुळे 'अपने २' सिनेमा आता बनणार नसल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. मात्र, आता चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावले असून, 'अपने २' निश्चितपणे बनणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अफवांवर निर्मात्यांचे स्पष्टीकरण
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक चाहते निराश झाले होते. या निराशेच्या वातावरणात 'अपने २' रद्द झाल्याची बातमी पसरली. यावर भाष्य करताना निर्माते दीपक मुकुट यांनी टाईम्स नाऊला सांगितले की, "लोकांनी अफवा पसरवणे थांबवले पाहिजे. 'अपने २' बंद झालेला नाही. हा चित्रपट बनत आहे आणि तो पूर्ण आत्मविश्वासाने बनवला जाईल. 'अपने २' हा भावनिक आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी एक चित्रपट आहे. हा चित्रपट धरमजींच्या खूप जवळचा होता. त्यांची उपस्थिती, त्यांचा उत्साह आणि त्यांचे विचार या चित्रपटाला प्रेरणा देणारे होते.''
'अपने २' असेल धर्मेंद्र यांना भावनिक श्रद्धांजली
दीपक मुकुट यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, "'अपने २' हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे हा चित्रपट धर्मेंद्र यांना दिलेली एक मोठी श्रद्धांजली असेल. त्यामुळे अपने २ लवकरच तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसेल."
'अपने २'च्या सीक्वलमध्ये धर्मेंद्र यांच्यासह सनी देओल, बॉबी देओल आणि त्यांचे नातू करण देओल हे प्रमुख भूमिकेत दिसणार होते. या सीक्वलची घोषणा मूळ 'अपने' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर करण्यात आली होती. मात्र धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आता चित्रपटाच्या कथानकात काही रचनात्मक बदल केले जात आहेत. धर्मेंद्र यांची सिने-कारकीर्द लक्षात घेता, 'अपने २' च्या माध्यमातून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.