धुवांधार कमाईनंतरही सनी देओल आणि सलमान खानचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही रणवीर सिंगचा 'धुरंधर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:00 IST2025-12-11T14:56:49+5:302025-12-11T15:00:51+5:30
Ranveer Singh's 'Dhurandhar' : रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. तरीही सलमान खान आणि सनी देओलचा रेकॉर्ड मोडू शकला नाही.

धुवांधार कमाईनंतरही सनी देओल आणि सलमान खानचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही रणवीर सिंगचा 'धुरंधर'
अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)चा अॅक्शनपट 'धुरंधर' (Dhurandhar Movie) ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या स्पाय ॲक्शन चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'धुरंधर'ला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. चित्रपटाने खूप लवकर १५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता आणि लवकरच हा २०० कोटींचा टप्पाही पार करेल. 'धुरंधर' उत्कृष्ट कमाई करत असतानाही, हा चित्रपट सलमान खान आणि सनी देओलचा महत्त्वाचा विक्रम मोडू शकलेला नाही.
'धुरंधर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटाने भारतात आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तसेच चित्रपटाने बुधवारीही चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट आठवड्याच्या दिवसांमध्येही जोरदार कलेक्शन करत आहे. 'धुरंधर'चे कलेक्शन वीकडेमध्येही वाढत आहे. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे. 'धुरंधर' हा खूप लवकर २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे.
सनी आणि सलमानचा रेकॉर्ड नाही तोडू शकला 'धुरंधर'
'धुरंधर'चे एकूण कलेक्शन उत्कृष्ट असले तरी, हा चित्रपट मंगळवारच्या कलेक्शनमध्ये मात्र मागे पडला आहे. कोईमोईच्या रिपोर्ट्सनुसार, सनी देओलच्या 'गदर २'ने मंगळवारी ५५.४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, तर सलमान खानच्या 'टायगर ३' ने ४४.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या दिवसाच्या कलेक्शनमध्ये रणवीर सिंगचा 'धुरंधर' मागे पडला आहे. 'धुरंधर'ने मंगळवारी २८.६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
मंगळवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी
गदर २ - ५५.४ कोटी
टायगर ३ - ४४.७५ कोटी
ॲनिमल - ३७.८२ कोटी
वॉर - २८.९ कोटी
किक - २८.८९ कोटी
सिम्बा - २८.१९ कोटी
धुरंधर - २८.६ कोटी
स्त्री २ - २६.८ कोटी
जवान - २६.५२ कोटी
छावा - २५.७५कोटी
मंगळवारच्या कमाईच्या बाबतीत, 'धुरंधर' टॉप १० मध्ये फक्त सातव्या क्रमांकावर स्थान मिळवू शकला आहे. या यादीत 'धुरंधर'च्या वर रणवीर सिंगचाच चित्रपट 'सिम्बा' आहे. आता या वीकेंडला 'धुरंधर' किती कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.