Deepak Dobriyal: ७ हजारचं कर्ज, 'ते' ९० दिवस सोडले नशिबावर; 'भोला'च्या अश्वत्थामाचा बॉलिवूडमधील स्ट्रगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:23 IST2023-04-12T16:21:11+5:302023-04-12T16:23:21+5:30
बॉलिवूडवाल्यांनी एका सिरिअस अभिनेत्याला कॉमेडी अभिनेता बनवलं.

Deepak Dobriyal: ७ हजारचं कर्ज, 'ते' ९० दिवस सोडले नशिबावर; 'भोला'च्या अश्वत्थामाचा बॉलिवूडमधील स्ट्रगल
अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात 'अश्वत्थामा' या खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) आहे हे फार कमी लोकांनी ओळखले असेल. नेहमी विनोदी भूमिकांमध्ये दिसणाऱ्या दीपक डोबरियालने 'भोला'मध्ये मात्र चांगलाच भाव खाल्ला.चाहत्यांनाही त्याचा अभिनय भलताच पसंतीस पडला. दीपकने त्याच्या एकंदर बॉलिवूड एंट्री ते अश्वत्थामाची भूमिका याबद्दल एका मुलाखतीत दिलखुलास चर्चा केली .
दीपकचा बॉलिवूडमधील स्ट्रगल
दीपकचा दिल्लीतील थिएटर पासून मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. या शहराने आणि नशिबाने त्याची खूप परिक्षा घेतली. दीपक म्हणाला,स्ट्रगल काळात एक वेळ अशी आली होती जेव्हा माझ्याजवळचे सगळे पैसे संपले होते. काहीच मनासारखं घडत नव्हतं. मी दिल्लीच्या सगळ्या मित्रांकडून पैसे घेतले. कोणी एक हजार, तर कोणी पाच हजार पाठवले. एकूण माझ्याकडे ६ ते ७ हजार रुपये जमा झाले. मग मी समोर कॅलेंडर पाहून 90 दिवसांची तारीख फिक्स केली. मी ठरवलं या ९० दिवसात जितके दिवस माझ्याजवळ हे पैसे असतील मी मुंबईत राहीन आणइ काम करेन. इतकी बँड वाजलीच आहे तर अजुन थोडी सही. ऑडिशनसाठी फोनही आले पण मी गेलो नाही.मी घरीच थांबायचो, खायचो, पिक्चर पाहायचो आणि झोपायचो. मी ९० दिवस सगळं नशीबावर सोपवलं होतं.आणि या ९० दिवसात मला एका बड्या जाहिरातीची ऑफर आली त्याचे मला १ लाख रुपये मिळाले. बस त्यानंतर मागे वळून बघितलं नाही.
कॉमेडी नाही मी तर गंभीर अभिनेता
आश्चर्य वाटतं जी माझी प्रतिमा बनली आहे मी त्याच्या बरोबर उलटा आहे.थिएटरच्या दिवसात मी गंभीर भूमिका करायचो. तुगलक, गिरीश कर्नाडचे नाटक, शेक्सपियर, धर्मवीर भारती सारख्या नाटकातील गंभीर भूमिका मी साकारल्या. करिअरच्या सुरुवातीला केलेल्या चित्रपटातही गंभीर भूमिका केल्या. ओमकारा मध्ये माझा निगेटिव्ह रोल होता. पण नशीबात काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं. दिल्लीमधील मित्र तर हसतात म्हणतात की बॉलिवूडवाल्यांनी एका सिरिअस अभिनेत्याला कॉमेडी अभिनेता बनवलं. आता भोला मुळे मी मी माझ्या आवडीच्या भूमिका निवडायला लागलो आहे. माझ्या विविधांगी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळतील हे नक्की.