"माझ्या अंगाला हात लावायचा नाही", अक्षयवर संतापला होता भाईजान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:48 IST2026-03-21T11:47:52+5:302026-03-21T11:48:33+5:30
Salman khan: ' मुझसे शादी करोगी' या सिनेमाच्या सेटवर सलमान खिलाडी कुमारवर चांगलाच संतापला होता.

"माझ्या अंगाला हात लावायचा नाही", अक्षयवर संतापला होता भाईजान
बॉलिवूडमधील दोन दिग्गज अभिनेता म्हणजे सलमान खान (salman khan) आणि अक्षय कुमार (akshay kumar). या दोन्ही कलाकारांनी उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या दोघांचाही चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन चांगली बॉण्डिंग आहे. मात्र,' मुझसे शादी करोगी' या सिनेमाच्या सेटवर सलमान खिलाडी कुमारवर चांगलाच संतापला होता.
डेव्हिड धवन यांच्या 'मुझसे शादी करोगी' या सिनेमात या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही उत्तम गाजला. विशेष म्हणजे या दोघांच्या बॉण्डिंगला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. परंतु, या सिनेमाच्या सेटवर असा एक प्रसंग घडला ज्यामुळे सलमान अक्षयवर चिडला होता.
अलिकडेच डेव्हिड धवन यांनी कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेमाच्या सेटवर घडलेला किस्सा सांगितला. सिनेमाच्या सेटवर या दोन्ही कलाकारांना एकत्र मॅनेज करणं म्हणजे मोठा टास्क होता, असं ते यावेळी म्हणाले.
अक्षय आणि सलमान हे दोघेही वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र मॅनेज करणं म्हणजे कठीण काम होतं. यात अक्षयला अभिनय करतांना सतत हात हलवायची सवय आहे. त्यामुळे सलमान माझ्याकडे यायचा आणि सांगायचा, याला (अक्षयला) सांग मला हात लावायचा नाही. अक्षयची ही सवय सलमानला जराही आवडायची नाही, असं डेव्हिड धवन म्हणाले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान आणि अक्षय या दोघांनी वेगवेगळ्या वेळांमध्ये त्यांचं शुटिंग पूर्ण केलं. अक्षय सकाळच्या वेळात शुटिंग करायचा तर सलमान संध्याकाळी. यावेळी कलाकार त्यांच्या डुप्लिकेट्ससोबत काम करायचे. तसंच, जिथे जास्त आवश्यकता आहे असेच सीन या दोघांनी एकत्र शूट केले.