'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:44 IST2025-04-03T15:44:24+5:302025-04-03T15:44:39+5:30
'फुले' हा सिनेमा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.

'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?
Phule Movie: गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले (Jyotirao Phule) यांच्या जयंतीला 'फुले' (Phule) या हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. झी स्टुडियोची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरू आहे. या सिनेमात प्रतिक गांधी (Pratik Gandhi) महात्मा फुले तर अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून 'फुले' हा सिनेमा येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात लहान सावित्रीबाईंची भूमिका साकारण्याची संधी एका मराठमोळ्या मुलीला मिळाली आहे.
सावित्रीबाईंची भूमिकेत बालकलाकार राधा धारणे (Radha Dharne) ही दिसणार आहे. भूमिकेविषयी ती म्हणाली, "माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. जेव्हा मला या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सहयोगी निर्माता रोहन गोडांबे यांनी बोलावलं, तेव्हा मी खूप उत्सुक होते. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी मला काही संवाद वाचायला दिले आणि माझी प्रतिक्रिया विचारली. काही दिवसांनी जेव्हा मला कळलं की, मी लहान सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी निवडली गेले आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला".
राधाने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली. त्या काळातील बोली, वेशभूषा आणि हावभाव यावर बारकाईने लक्ष दिलं. "मी पहिल्यांदाच नऊवारी साडी नेसली. त्यात चालणं, बोलणं वेगळंच वाटायचं. शिवाय त्या काळातील भाषा थोडी वेगळी होती, त्यामुळे त्यावरही मी विशेष मेहनत घेतली" असं ती सांगते.
शुटिंगदरम्याच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, "एक सीन असा होता, जिथे मला एका खडतर वाटेवरून, शेतातून चालत जाऊन ज्योतिबा यांना जेवण द्यायचं होतं. तो प्रसंग खूप भावनिक होता आणि मला तो फार आवडला". यासोबतच मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा असल्याचं तिनं सांगितलं. राधा म्हणाली, "ते नेहमी मार्गदर्शन करायचे, संवाद नीट कसे म्हणायचे, भाव कसे आणायचे हे मला सहकलाकारांकडून शिकायला मिळालं". राधा सध्या सहावीत शिकत आहे आणि शाळेच्या अभ्यासासोबत अभिनय कसा सांभाळते याबद्दल तिनं सांगितलं, "शाळेच्या शिक्षकांचा मला खूप पाठिंबा आहे. शुटिंगदरम्यान वेळ मिळेल तसा मी अभ्यास पूर्ण करते. अभिनय आणि शिक्षण दोन्ही सांभाळायला मला आवडतं".
दरम्यान, 'फुले' हा राधाचा पहिला चित्रपट नाहीये. याआधी तिनं 'थ्री ऑफ अस' या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तसेच Buttrlerfly मराठी चित्रपटातही ती झळकली आहे. 'सत्यवान सावित्री', 'नकळत सारे घडले', 'किमयागार' या मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.