'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:53 IST2025-02-14T11:51:39+5:302025-02-14T11:53:02+5:30
'छावा' सिनेमाची स्टारकास्ट समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण, 'छावा' सिनेमात शिवाजी महाराज दिसत नाहीत.

'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असा विकी कौशलचा 'छावा' सिनेमा अखेर आज (१४ नोव्हेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशलनेछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची स्टारकास्ट समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण, 'छावा' सिनेमात शिवाजी महाराज दिसत नाहीत.
विकी कौशलच्या 'छावा'मध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. छावा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व तर आहे. पण, ते सिनेमात मात्र दिसत नाहीत. कोणत्याही अभिनेत्याने किंवा व्यक्ती सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली नाही. सिनेमात शिवाजी महाराजांचा फक्त आवाज ऐकू येतो. हा आवाज लक्ष्मण उतेकर यांनीच दिला आहे. ते शंभूराजेंसोबत संवाद साधताना दाखवण्यात आलं आहे. पेचात सापडलेल्या शंभू महाराजांना रस्ता दाखवण्यासाठी वेळोवेळी शिवाजी महाराज येतात. पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमात असा प्रयोग करण्यात आला आहे. पण त्यामुळे संभाजी महाराजांच्या कथेवरुन अजिबात फोकस हलल्याचं जाणवत नाही. उलट यामुळे संभाजी महाराजांची दुसरी बाजू दाखविण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.
'छावा' सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्यासोबत अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर दिव्या दत्ता राजमाता सोयराबाईंच्या भूमिकेत आहेत. सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर,मनोज कोल्हटकर हे मराठी कलाकार झळकले आहेत.