'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:52 IST2025-02-18T10:44:50+5:302025-02-18T10:52:40+5:30
'छावा' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू असतानाच एका प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडल्याची घटना गुजरातमधील भरुच येथे घडली आहे.

'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?
विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाने थिएटर दणाणून सोडलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि बलिदानावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या सिनेमाचं आणि त्यातील कलाकारांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
'छावा' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू असतानाच एका प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडल्याची घटना गुजरातमधील भरुच येथे घडली आहे. रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या शोदरम्यान हा प्रकार घडला आहे. चित्रपटातील क्लायमेक्स सुरू होताच प्रेक्षकाने हे कृत्य केलं. 'छावा'मध्ये औरंगजेब संभाजी महाराजांना कैद करतो आणि महाराजांचा छळ करतो. हा सीन सुरू होताच प्रेक्षकाने उठून थिएटरमधील पडदा फाडत त्याचं नुकसान केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#Chhaava ફિલ્મના નાઈટ શોમાં એક વ્યક્તિ આવ્યો અને સ્ક્રિનનો પરદો ફાડી નાખ્યો!
— MG Vimal - વિમલ પ્રજાપતિ (@mgvimal_12) February 17, 2025
ઘટનાઃ blue chip complex, Bharuch#Bharuch#Chhava#VickyKaushal#multiplex#screen#Damage#bluechipcomplexpic.twitter.com/nVMEnDo8Zz
प्रेक्षकाने पडद्याचे नुकसान करताच थिएटर मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचं नाव जयेश वसावा असं आहे. हा आरोपी सिनेमा पाहतान शुद्धीत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्या थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर सिनेमा दाखवला गेला तर अन्य काही प्रेक्षकांचे पैसे थिएटरकडून परत करण्यात आले आहेत.
दरम्यान, 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवरही तुफान कामगिरी करत आहे. या सिनेमाने ४ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर १४० कोटींचा टप्पा पार केला आहे. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अनेक मराठी कलाकारही या सिनेमात झळकले आहेत.