'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:52 IST2025-03-25T13:51:02+5:302025-03-25T13:52:12+5:30
Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करताना दिसत आहे.

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा
अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करताना दिसत आहे. अद्याप या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील कमाईचा वेग कायम आहे. हिंदी चित्रपटांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रेकॉर्ड मोडणाऱ्या या चित्रपटाने सहाव्या वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर आठवड्याच्या दिवशीही थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.
छावा चित्रपटाच्या रिलीजला आज ३९वा दिवस आहे आणि या चित्रपटाने शाहरुख खानचा जवान वगळता प्रत्येक मोठ्या बॉलीवूड चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. चित्रपटाच्या आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने पाच आठवड्यांत म्हणजे ३५ दिवसांत एकूण ५८५.८१ कोटी रुपयांची कमाई केली, दोन आठवड्यांत हिंदीतून ५७१.४० कोटी रुपये आणि तेलुगूमधून १४.४१ कोटी रुपये कमावले. यानंतर ३६, ३७ आणि ३८व्या दिवशी दोन्ही भाषांमध्ये चित्रपटाची कमाई २.१ कोटी, ३.६५ कोटी आणि ४.६५ कोटी होती. म्हणजेच ३८ दिवसांत एकूण ५९६.२१ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. सॅकनील्कच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी १०.३० पर्यंत चित्रपटाने १.७५ कोटींची कमाई केली असून एकूण ५९७.९६ कोटींची कमाई झाली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात. फायनल डेटा आल्यानंतर, कमाईमध्ये थोडीफार वाढ होईल.
'छावा' बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ठरला दुसरा चित्रपट
आज छावाने असा काही कमाल केला आहे जो अनेक चित्रपट अनेक महिने चित्रपटगृहात राहूनही करू शकले नाहीत. आज हा चित्रपट टॉप ३ सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला आहे. चित्रपटाने श्रद्धा कपूरच्या स्त्री २ च्या ५९७.९९ कोटी रुपयांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. आता फक्त एकच बॉलीवूड चित्रपट या चित्रपटाच्या पुढे आहे आणि तो म्हणजे २०२३ साली शाहरुख खानचा जवान. या चित्रपटाने ६४०.२५ कोटींची कमाई केली होती.