असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ
By सुजित शिर्के | Updated: March 13, 2025 11:27 IST2025-03-13T11:25:54+5:302025-03-13T11:27:26+5:30
'छावा' फेम विकी कौशलने शेअर केला संगमेश्वर लढाईचा 'तो' Unseen व्हिडीओ

असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ
Vicky Kaushal: सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत गाजत असलेला 'छावा' (Chhaava) चित्रपटाचं नाव प्रत्येक सिनेप्रेमीच्या ओठांवर आहे. छावा हा बहुचर्चित चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय चित्रपटसृष्टीकडे वेधलं आहे. दरम्यान, छावा साठी प्रत्येक कलाकाराने घेतलेली मेहनत तसेच कठोर प्रक्षिणाचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहेत. चित्रपटातील लढाईचे सीन पाहून प्रेक्षक सुद्धा अक्षरश भारावून गेले आहेत. अशातच अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) अखेरचा संगमेश्वरच्या लढाईचा सीन कसा शूट करण्यात आला याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, शंभुराजांनी बुऱ्हाणपूरवर आक्रमण केल्यानंतर औरंगजेब पूर्णपणे खचून जातो. त्यानंतर जोपर्यंत शंभूराजेंना कैद होत नाही तोपर्यंत डोक्यावर 'ताज' परिधान करणार नाही असा तो प्रण घेतो. त्यानंतर क्रुर औरंग स्वराज्याच्या दिशेने संपूर्ण फौजेसह चालून येतो. शेवटी संगमेश्वर येथे महाराजांना कैद करण्यात येते. अखेरच्या या चित्तथरारक लढाईचे सीन कसे शूट करण्यात याचा अनसीन व्हिडीओ विकी कौशलनेसोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वराज्याच्या मातीसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्युला कवटाळलं होतं. ही संपूर्ण इतिहास चित्रपटरूपी मांडताना कशा पद्धतीने मेहनत घ्यावी लागली याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून येतो.
विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत "छावा' द लास्ट स्टॅंड...", असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "जगात फक्त 'छावा'चा आवाज घुमला पाहिजे...", तर आणखी एका यूजरने प्रतिक्रिया देत लिहिलंय, पाहुनी शौर्य तुझ्यापुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला..."
'छावा' या ऐतिहासिक चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.