'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:28 IST2025-02-10T13:25:36+5:302025-02-10T13:28:44+5:30
सेन्सॉर बोर्डाने 'छावा'च्या काही संवादांमध्ये बदल सुचवले असून सिनेमा पाहताना काही संवाद प्रेक्षकांना वेगळे ऐकायला मिळतील (chhaava, vicky kaushal)

'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या
'छावा' (chhaava movie) सिनेमाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकतेय. टीझर, ट्रेलर पाहूनच 'छावा'च्या संवादांचं चांगलंच कौतुक झालं. 'फाड देंगे मुघल सल्लतनत की छाती, अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुरत की..!', 'हम शोर नही करते सिधा शिकार करते है..!' असे दमदार संवाद ऐकायला मिळाले. पण 'छावा'मधल्या याच संवादांवर आता सेन्सॉरने कात्री लावली आहे.
'छावा'चे हे संवाद बदलले
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या 'छावा'मधील अनेक संवादांवर सेन्सॉरने कात्री लावली आहे. 'मुगल सल्तनत का जहर' हा डायलॉग बदलून 'उस समय कई शासक और सल्ननत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे।' असा डायलॉग ठेवण्यात आलाय. याशिवाय 'खून तो आखिर मुगलों का ही है' हा संवाद बदलण्यात आला आहे. याशिवाय 'हरामजादा' शब्दाला म्यूट करण्यात आलंय. अशाप्रकारे प्रेक्षकांना काही संवादांमध्ये बदल बघायला मिळतील. सेन्सॉरने 'छावा'ला UA सर्टिफिकेट दिलं असून २ तास ४१ मिनिटांचा हा सिनेमा असणार आहे.
छावाच्या अॅडव्हान्स बूकींगला सुरुवात
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. बूक माय शो या तिकिट बुकींग साइटवर गेल्यास तुम्हाला कळेल की, अनेक ठिकाणी पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात विकलं जातंय. मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु 'छावा'च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. इतकंच नव्हे तर PVR, INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत बघायला मिळतंय. 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बूकींगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.