"त्या व्यक्तीने शर्ट काढला अन्..." माधुरी दीक्षितने सांगितला 'एक दो तीन' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 14:47 IST2024-11-16T14:42:20+5:302024-11-16T14:47:50+5:30
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) 'भूलभूलैया-३' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

"त्या व्यक्तीने शर्ट काढला अन्..." माधुरी दीक्षितने सांगितला 'एक दो तीन' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा 'तो' प्रसंग
Madhuri Dixit: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) 'भूलभूलैया-३' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्रीचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. माधुरीने दीक्षितने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केला आहे. 'हम आपके है कौन','तेजाब', , 'दिल तो पागल है', 'साजन', 'खलनायक', 'बेटा' यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. सध्या अभिनेत्री 'भूलभूलैया-३' चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. त्यादरम्यान तिने 'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा मजेदार किस्सा सांगितला.
अलिकडेच माधुरी दीक्षितने 'ANI'ला दिलेल्या मुलाखतीत 'तेजाब'मधील एक किस्सा शेअर केला. माधुरी दीक्षितचा 'तेजाब' हा चित्रपट प्रेक्षकांना आडवतो. या चित्रपटात तिने साकारलेल्या मोहिनी या भूमिकेचं प्रेक्षकांनी चांगलंच कौतुक केलं होतं. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटात तिने साकारलेली मोहिनी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील 'एक दो तीन' या गाण्याविषयी तिने या मुलाखतीत एक गंमत सांगितली. या दरम्यान मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "एक दो तीन' गाण्याच्या शूटिंगसाठी मोठा सेट तयार करण्यात आला होता. आम्हाला आधीच कल्पना देण्यात आली होती की गाण्याच्या शूटसाठी बराच वेळ जाणार आहे. त्यासाठी सगळी तयारी करायला सांगितली होती. त्यामुळे मला सरोज खान यांच्यासोबत डान्सची रिहर्सल करायची होती. कारण क्लासिकल डान्स आणि बॉलिवूड डान्समध्ये खूप फरक असतो. त्यावेळी मला त्यांच्याकडून नृत्याचे धडे मिळाले".
पुढे अभिनेत्री म्हणाली, "एक दो तीन गाण्याचं शूट केलं तेव्हा एक मजेदार किस्सा घडला होता. हे गाणंच खूप सुंदररित्या कंपोझ केलं होतं. मला आठवतंय एके दिवशी शूट करताना सेटवर माणसं फार कमी होती. त्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि मेहबूब हॉल भरला. त्यादरम्यान एका व्यक्तीला 'एक दो तीन' गाणं इतकं आवडलं की त्याने त्याचा शर्ट काढला आणि हवेत फेकून दिला. या गाण्यावर तो बेभान होऊन नाचला. प्रेक्षकांमध्ये तेव्हा वेगळाच उत्साह संचारला होता. मला ते गाणं खूप आवडलं होतं. त्यामधील नृत्यही सुंदर होतं. परंतु त्या गाण्याचा लोकांवर असाही परिणाम होईल, असं मला वाटलं नव्हतं".