"कृपया हे सगळं बंद करा...", सोशल मीडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून करीना कपूरने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:16 IST2025-01-21T11:13:19+5:302025-01-21T11:16:05+5:30
अभिनेत्री करीना कपूर संतापली, नेमकं प्रकरण काय?

"कृपया हे सगळं बंद करा...", सोशल मीडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून करीना कपूरने व्यक्त केला संताप
Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali khan) झालेला हल्ला हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी एका चोराने घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्या झटापटीत सैफच्या शरीरावर चोराने सहा ठिकाणी वार केले आणि या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला. त्यानंतर सैफला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घडल्या प्रकारानंतर सैफची पत्नी म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) आवाहन केलं होतं. परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन लोक तैमुर आणि जेहसाठी काही नवीन खेळणी आणताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता करीनाने नाराजी व्यक्त केली आहे. "कृपया हे सगळं बंद करा. थोडी तरी दया दाखवा, आम्हाला आता एकटं सोडा." दरम्यान, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर खान कुटुंबीयांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर दिली जात आहे. आपल्या सुरक्षेकरिता हे सगळं नेटिझन्सने थांबवावं, अशा म्हणत करीनाने विनवणी केली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या घरी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कसा झाला आणि त्यामागे नेमकं कारण काय होतं, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.