जॉन अब्राहमने 'या' कारणामुळे नाकारली 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाची ऑफर, म्हणाला- "त्यामध्ये माझी भूमिका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:36 IST2024-12-16T12:32:26+5:302024-12-16T12:36:37+5:30
बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम (John Abraham).

जॉन अब्राहमने 'या' कारणामुळे नाकारली 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाची ऑफर, म्हणाला- "त्यामध्ये माझी भूमिका..."
John Abraham: बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम (John Abraham). मॉडेलिंग क्षेत्रात करिअयर करत असताना अभिनेत्याने आपली पाऊले अभिनय क्षेत्राकडे वळवली. नायकच नाही अनेक खलनायिकी भूमिका साकारून अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक विविध धाटणीच्या भूमिका त्याने उत्कृष्टरित्या निभावल्या आहेत. 'जिस्म' या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करत जॉनने आज इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. परंतु या चित्रपटापूर्वी अभिनेत्याला शाहरुख खानसोबत एका सुपरहिट चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. पण, जॉन अब्राहमने ती ऑफर नाकारली.
अभिनेता जॉन अब्राहमने 'जिस्म' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या चित्रपटामध्ये त्याने बिपाशा बासूसोबत स्क्रीन शेअर केली होती.'जिस्म'मधील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. परंतु जिस्म चित्रपटापूर्वी जॉनला करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' ची ऑफर मिळाली होती. परंतु काही कारणास्तव त्याने ऑफर नाकारली होती. याचा खुलासा अभिनेत्याने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केला होता.
कॉफी विथ करणच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितलं होतं की, "चित्रपट निर्मात्यांनी मला 'कभी खुशी कभी गम' साठी ऑफर दिली होती. त्यामध्ये माझी भूमिका फारच छोटी होती. रॉबी नावाची व्यक्तिरेखेसाठी मला कास्ट करण्याचा त्यांचा निर्णय होता. जो करिना कपूरच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारतो."
पुढे जॉन अब्राहमने सांगितलं की म्हणाला, "करणने मला जेव्हा त्या भूमिकेसाठी विचारणा केली होती तेव्हा तो मला म्हणाला होता की, जॉन हा खूप चांगला रोल आहे आणि मला वाटतं तू तो केला पाहिजे. पण, मी त्या भूमिकेसाठी नकार दिला. मी करणला म्हटलं की कृपया तुम्ही यामुळे काही वाईट वाटून घेऊ नका. पण, त्यावेळी 'जिस्म' सिनेमाचं शूटिंग सुरू असल्यामुळे मी ती भूमिका नाकारली."
करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला. अमिताभ- जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर, फरिदा जलाल अशी तगडी स्टार कास्ट घेत करणने एका उच्चभ्रू कुटुंबाची कथा करण जोहरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता.