हृतिक रोशन 'या' निसर्गरम्य ठिकाणी घेतोय ट्रेकिंगचा आनंद; अभिनेत्याला पाहून लोकांना विश्वासच बसला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:20 IST2025-12-19T11:14:14+5:302025-12-19T11:20:23+5:30
हृतिक रोशनचे ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साध्यासुध्या पेहरावात हृतिकला ट्रेकिंग करताना पाहताच चाहते थक्क झाले आहेत

हृतिक रोशन 'या' निसर्गरम्य ठिकाणी घेतोय ट्रेकिंगचा आनंद; अभिनेत्याला पाहून लोकांना विश्वासच बसला नाही
बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता ऋतिक रोशनचे जगभरात अनेक चाहते आहेत. ऋतिक रोशन फार मोजक्या बॉलिवूड पार्टी, पुरस्कार आणि इव्हेंटना हजेरी लावताना दिसतो. शूटिंग नसेल तेव्हा ऋतिक त्याच्या कुटुंबासोबत घरीच राहणं पसंत करतो. अशातच ऋतिक झगमगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगला गेला आहे. कोणत्या ठिकाणी हृतिक भटकंती करतोय? जाणून घ्या
या ठिकाणी हृतिक ट्रेकला गेला
हृतिक रोशन उत्तराखंडच्यानिसर्गरम्य डोंगररांगांमध्ये ट्रेकला गेला आहे. तो तिथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गुरुवारी ऋतिकने सोशल मीडियावर आपल्या ट्रेकिंगचे काही खास फोटो शेअर केले, जे सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ऋतिक हातात काठी घेऊन डोंगराळ वाटांवर ट्रेकिंग करताना दिसत आहे. साध्यासुध्या पेहरावात हृतिक ट्रेकला आलेला बघून आजूबाजूचे लोक थक्क झाले आहेत. त्यांना विश्वासच बसला नाही.
हृतिकने पिवळ्या रंगाचे शर्ट, जॅकेट, टोपी आणि ट्रेकिंग बॅक पॅक सोबत घेतली आहे. हिरवेगार डोंगर आणि धुक्याने वेढलेले रस्ते पाहून चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला. मात्र, त्यासोबतच अनेकांनी ऋतिकच्या 'कोई मिल गया' या गाजलेल्या चित्रपटाची आठवण काढत त्याची फिरकी घेतली. सोशल मीडियावर चाहत्यांनी "तिथे जादू मिळाला का?" किंवा "जादूच्या शोधात आहेस का?" अशा मजेशीर कमेंट्स करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर हृतिकने एक भावूक कॅप्शनही लिहिले आहे. त्याने म्हटले, "खडतर वाटांवर ट्रेकिंग केल्यामुळे माझे मन आनंदाने भरून येते. निसर्गाशी जोडले जाणे हीच खरी जीवनशैली आहे." हृतिकच्या या फोटोंवरून तो केवळ जिममध्ये व्यायाम करण्यालाच महत्त्व देत नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात राहून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ जपण्यावरही भर देतो, हे चाहत्यांना कळालं आहे.
वर्कफ्रंटवर काय सुरू आहे?
हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी प्रकल्पांमध्येही व्यस्त आहे. तो 'HRX Films' अंतर्गत अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'स्टॉर्म' (Storm) या सीरिजद्वारे निर्माता म्हणून ओटीटी पदार्पण करत आहे. याशिवाय, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वॉर २' मधील त्याच्या अॅक्शननंतर चाहते आता त्याच्या बहुप्रतिक्षित 'क्रिश ४' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.