माझ्यावर बायोपिक आला तर 'या' अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी; धर्मेद्र यांनी व्यक्त केली होती इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:57 IST2025-11-11T16:54:07+5:302025-11-11T16:57:30+5:30
सनी, बॉबी नव्हे तर धर्मेंद्र यांनी स्वतःच्या बायोपिकसाठी धर्मेंद्र यांनी घेतलं होतं या अभिनेत्याचं नाव. कोण आहे हा अभिनेता?

माझ्यावर बायोपिक आला तर 'या' अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी; धर्मेद्र यांनी व्यक्त केली होती इच्छा
आपल्या तब्येतीच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या चर्चेत आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, सलमान खान, शाहरुख खान आणि गोविंदा यांसारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आहे. यानिमित्त धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक किस्से समोर येत आहेत. स्वतःवर बायोपिक निघाला तर कोणी भूमिका साकारावी? असं धर्मेंद्र यांना विचारलं असता त्यांनी कोणाचं नाव घेतलं? जाणून घ्या.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या बायोपिकसाठी सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. धर्मेंद्र आजारी असल्याचं समजताच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलेली पहिली व्यक्ती होती ती म्हणजे सलमान खान. सलमान खानला देओल कुटुंबाच्या खूप जवळचे मानले जाते आणि तो धर्मेंद्र यांना वडिलांसारखा आदर देतो. याच कारणामुळे, धर्मेंद्र यांनी एकदा त्यांच्या बायोपिकसाठी त्यांचे मुलगे सनी आणि बॉबी देओल यांचं नाव न घेता ऐवजी सलमान खानचे नाव घेतले होते.
सलमान खान धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध ठेवतो. याच कारणामुळे 'धरम पाजी' यांना वाटते की, जर कधी त्यांचा बायोपिक बनला, तर त्यासाठी सलमानची निवड योग्य असेल.
२०१५ मध्ये बॉलिवूड लाईफसोबत झालेल्या एका संवादात, धर्मेंद्र यांना त्यांच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले होते, “मला वाटते की सलमानमध्ये अनेक गोष्टी आहेत, ज्या माझ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. मला खात्री आहे की, तो पडद्यावर माझी भूमिका उत्तमरित्या निभावू शकेल.” याव्यतिरिक्त अनेक प्रसंगी सलमान आणि धर्मेंद्र यांच्यात एक खास नाते दिसून आले आहे. 'यमला पगला दीवाना' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळीही धर्मेंद्र यांनी सलमानचे भरभरून कौतुक केले होते.
त्यावेळी सलमानबद्दल बोलताना धर्मेंद्र म्हणाले होते, “आज मी इंडस्ट्रीतील कोणालाही बोलावले, तर प्रत्येकजण माझ्याबद्दल चांगली भावना असल्याने हजर असतो. सलमान स्वतः एक खूप चांगला माणूस आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, तो एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. तो खूप निर्मळ मनाचा आहे.”
सलमानची आठवण सांगताना धर्मेंद्र म्हणाले होते, “एकदा मी एका तलावाजवळ माझ्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि मी पहिल्यांदा सलमानला पाहिले. तेव्हा तो खूप लाजाळू होता आणि आजही तो खूप लाजाळू आहे. शूटिंग दरम्यान एकदा कॅमेरा तलावात पडला आणि तो काढण्यासाठी सलमानने थेट तलावात उडी मारली. त्यावेळी मी विचार केला की हा मुलगा खूप धाडसी आहे. तो एक भावूक माणूस आहे. तुम्ही चांगले माणूस नसाल तर तुम्ही काहीच नाही.”
धर्मेंद्र यांच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी सोमवारी समोर आली, तेव्हा सलमान खानही आपल्या आवडत्या स्टारला भेटायला रुग्णालयात पोहोचला होता. यावेळी सलमानच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत होती.