"भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही...", मराठी-हिंदी वादावर आशुतोष राणा स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:39 IST2025-07-16T09:36:08+5:302025-07-16T09:39:03+5:30
मराठी-हिंदी वादावर आशुतोष राणा यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

"भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही...", मराठी-हिंदी वादावर आशुतोष राणा स्पष्टच बोलले
Ashutosh Rana : सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषिक वाद चांगलाच पेटलेला आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिली पासूनच्या हिंदी सक्तीमुळे हा विषय चर्चेत आला. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. हिंदी भाषेबद्दलचा हा निर्णय रद्द केल्यानंतरही भाषेचा वाद काही अजून संपलेला नाही. अनेक राजकीय आणि सामाजिक पातळ्यांवर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. तसंच मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळी देखील याप्रकरणी भाष्य करताना दिसत आहेत. अशातच या भाषेच्या मुद्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती, अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
अभिनेते आशुतोष राणा यांना हिर एक्सप्रेस चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान मराठी-हिंदी भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यादरम्यान, मराठीत उत्तर देत त्यांनी सर्वांची मनं जिंकली. मग ते म्हणाले, "माझ्या मुलांची भाषा ही मराठी आहे. शिवाय माझ्या पत्नीचीही मातृभाषा मराठीच आहे." त्यानंतर पुढे ते म्हणाले, "माझं वैयक्तिक असं मत आहे की, भाषा हा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय नसते. भारत हा एक महान देश आहे. जिथे सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यात आला आहे आणि या देशात संवादावर विश्वास ठेवला जातो. भारत वादावर विश्वास ठेवणारा देश नाही."
आशुतोष राणा सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'हीर एक्सप्रेस' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिविता जुनेजा आणि प्रीत कामानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर उमेश शुक्ला यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.