अशी वेळ कोणावरही येऊ नये! सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची वाईट अवस्था; अनुपम खेर यांनी शेअर केला भावुक Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:52 IST2025-11-01T11:47:57+5:302025-11-01T11:52:29+5:30
सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची झालीये 'अशी' अवस्था; अनुपम खेर यांनी शेअर केला डोळे पाणावणारा व्हिडीओ

अशी वेळ कोणावरही येऊ नये! सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची वाईट अवस्था; अनुपम खेर यांनी शेअर केला भावुक Video
Anupam Kher Share Video: चित्रपटात कितीही छोटी भूमिका असली तर निर्दोष विनोदी टायमिंगने ती भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आघाडीवर नाव असणारे अभिनेते सतीश शहा यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश शाह यांचं असं जाणं अनेकांना धक्का देणारं ठरलं. त्यांच्या निधनानंतर पत्नी मधू एकट्या पडल्या आहेत. त्या पूर्णपणे खचल्या आहेत. नुकतीच अभिनेते अनुपम खेर यांना मधू शाह यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून फार वाईट वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
सतीश शहांच्या पत्नी मधू यांना अल्झायमर आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी सतीश शहांना दीर्घकाळ जगायचे होते. मात्र, नियतीने काही औरच लिहून ठेवलं होतं. याच उद्देशाने त्यांनी किडनी प्रत्यारोपण केलेले. या दोघांची साथ अर्ध्यातच तुटली. अनुपम खेर आणि सतीश शाह यांची फार जुनी मैत्री आहे. आपल्या मित्राच्या जाण्याचं दु ख त्यांना सहन झालेलं नाही. नुकतेच अनुपम खेर स्वित्झर्लंडहून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांनी मधू शाह यांच्या भेट घेतली. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय,"स्वित्झर्लंडहून परत आल्यानंतर मी सतीश शाह यांची पत्नी मधुला भेटण्यासाठी गेलो. मनात दुःख आणि एक वेगळीच भीती जाणवत होती. मधु अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.माहित नाही तिला कधी काय आठवेल. मी तिच्यासोबत सतीशबद्दल बोलू की नाही, असे असंख्य प्रश्न मनात होते. मी माझे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या डोळ्यातील अश्रू सतीशच्या जाण्यामुळे आहेत की मधुच्या स्मृतीभ्रंशामुळे आहेत हे मलाच समजत नव्हतं. सतीशच्या घरी घालवलेला एक तास प्रचंड दुःखाने भरलेला होता. पण मी मधुला वचन दिलं की मी तिला कायम भेटत राहीन. कदाचित याशिवाय मी अजून काहीच करू शकत नाही."
त्यानंतर पुढे ते म्हणाले, "मधूने पहिल्यांदा मला ओळखलं आणि ती म्हणाली, आलास त्यासाठी धन्यवाद नंतर तिची स्मृती गेली. त्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती मला म्हणाली, तो निघून गेला. आणि मधुची स्मृती धुसर झाली. मग मी घरातून निघणार इतक्यात तिने म्हटलं, दुपारी जेवणासाठी घरी ये... पण, तो नसेल. तिचे ते शब्द ऐकून मला माझे अश्रू थांबवता आले नाही. मी लगेच घराबाहेर पडलो आणि रडायला लागलो."
सतीश शाह यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच असंख्य चाहत्यांना धक्काच बसला.दरम्यान, अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत.