'शोले'मध्ये अमिताभ बच्चन यांना साकारायचा होता 'गब्बर' पण...; नेमकं कुठे बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:34 IST2025-07-25T16:32:46+5:302025-07-25T16:34:49+5:30
हिंदी सिनेसृष्टीत एक क्लासिक आणि कल्ट सिनेमा म्हणून 'शोले' कडे पाहिलं जातं.

'शोले'मध्ये अमिताभ बच्चन यांना साकारायचा होता 'गब्बर' पण...; नेमकं कुठे बिनसलं?
Sholay Movie: हिंदी सिनेसृष्टीत एक क्लासिक आणि कल्ट सिनेमा म्हणून 'शोले' कडे पाहिलं जातं. १९७५ मध्ये ‘शोले’ प्रदर्शित झाला. आजही लोक हा सिनेमा आवडीने पाहतात. या चित्रपटाचं नावं जरी कोणी उच्चारलं तरी डोळ्यांसमोर गब्बर सिंग, जय-विरु, ठाकूर बलदेव सिंग, धन्नो, बसंती आणि रामगढचं ते गाव. अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि जया बच्चन हे कलाकार चित्रपटात झळकले. शिवाय चित्रपटातील जय विरूची मैत्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटामध्ये गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना साकारायची होती. पण, ते शक्य झालं नाही. 'बिग बीं' अनेकदा याबाबत बोलले आहेत.
जेव्हा लेखक सलीम-जावेद यांनी जेव्हा कलाकारांना 'शोले' ची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा त्यातील कलाकारांना स्वत:चं पात्र सोडून दुसरंच पात्र आवडलं होतं. त्यावेळी अमिताभ यांना गब्बर सिंगची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त होती. एका मुलाखतीत 'बिग बीं'ना शोले मध्ये गब्बीर सिंगची भूमिका करायची होती का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "जेव्हा आम्ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी गब्बर साकारणार असं रमेशजींना म्हटलं होतं. कारण, ते पात्र कोणालाही आवडलं असतं. पण, रमेशजींनी कोण, कुठली भूमिका साकारेल याबद्दल आधीच स्पष्टपणे सांगितलं."
पुढे ते म्हणाले, "सलीम-जावेद यांनी एका हिंदी नाटकात अमजद खान यांना काम करताना पाहिलं होतं. त्यांनीच गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खान यांचं नाव सूचवलं होतं. त्या चित्रपटावेळी माझी आणि अमजद यांची पहिल्याच दिवसापासून मैत्री झाली. त्यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी त्यांचा आवाज मिळता-जुळता नाही. पण, पुढे त्याच आवाजाने अमजद यांना ओळख मिळवून दिली. "
'शोले'मध्ये पहिल्यांदा गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना विचारणा करण्यात आली होती. पण, त्यांनी नकार दिल्यानंतर या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोपास यांना ऑफर देण्यात आली. त्यांनीही ती नाकारली अखेरीस या भूमिकेसाठी अमजद खान यांची निवड करण्यात आली.