कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी अक्षयच्या निर्मात्याने केलेला 'हा' भलताच जुगाड; अभिनेता म्हणाला-"त्यांनी १ रुपयात…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:02 IST2025-11-03T11:55:11+5:302025-11-03T12:02:29+5:30
कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी अक्षयच्या निर्मात्यांनी केलेला भलताच जुगाड; अभिनेता म्हणाला-"त्यांनी १ रुपयात…"

कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी अक्षयच्या निर्मात्याने केलेला 'हा' भलताच जुगाड; अभिनेता म्हणाला-"त्यांनी १ रुपयात…"
Akshay Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीत खिलाडी कुमार,अॅक्शन हिरो या उपाधिंनी ओळखला जाणारा, हजारो तरुणींच्या गळयातील ताईत असणारा, रोमांस, ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन या सर्व प्रकारांना लिलया हाताळणारा सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार. नुकतीच त्याच्या करिअरला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याने या काळात अनेक चढ-उतार पाहिले.तसेच आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले. मात्र, त्यातील काही चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं.
अक्षय कुमारने 'सौगंध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यामुळे तो चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र, १९९१ साली आलेल्या अक्षय कुमारच्या'डान्सर' या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात कमाई केली होती.पण, असं असूनही निर्मात्यांनी चित्रपट बनवताना कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी कंजुषी केली होती. कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये देखील अभिनेत्याने हा किस्सा शेअर केला होता.
अक्षयच्या कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी निर्मात्याने केलेला हा जुगाड
अक्षय कुमारने एका मुलाखतीत हा किस्सा शेअर करताना म्हणाला, "मी एक चित्रपट केला होता. ज्यामध्ये सफेद शर्ट आणि निळी जीन्स असा साधारण माझा लूक होता. त्यावेळी दिग्दर्शक म्हणाले, हा डान्सर आहे तर याला पांढरा शर्ट देऊ नका.त्याच्यासाठी ५-६ रंगीत शर्ट्स घेऊन या. त्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या कानात जाऊन काहीतरी कुजबुजल्या.मग कॅमेरामनने त्यांच्याकडे पाहिलं.मग तो कॅमेरामन दिग्दर्शकाकडे गेला आणि म्हणाला, कोणत्या रंगाचा शर्ट पाहिजे. ते म्हणाले, हिरव्या रंगाचा. त्यानंतर जे काही घडलं ते आश्चर्यकारक होतं."
मग अक्षय म्हणाला, "मी खरं सांगतो, २५ पैशांचे ६ जिलेटिन पेपर यायचे ते पेपर त्यांनी लाईट्सच्यावर लावले होते. त्यामुळे माझा शर्ट हिरवा तसंच पॅन्ट आणि चेहरा सुद्धा हिरवा दिसत होता. निर्मात्यांनी फक्त एक रुपयामध्ये मला चार शर्ट बनवले होते. " असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने सांगितला.
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन अशोक व्यास यांनी केलं होतं. कृती सिंह आणि मोहिनी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.