भूमी पेडणेकर म्हणते हा अभिनेता माझ्या आदर्शस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:53 IST2018-07-20T14:51:01+5:302018-07-20T14:53:03+5:30
भूमी पेडणेकर 'सोन चिरैया'मध्ये झळकणार आहे.

भूमी पेडणेकर म्हणते हा अभिनेता माझ्या आदर्शस्थानी
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारसोबत 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री व सिनेमा प्रेक्षकांना खूप चांगला भावला होता. तेव्हापासून भूमी अक्षयलाच आपला रोल मॉडेल मानते. तो माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती असून त्याच्याकडून बरेच काही शिकल्याचे भूमी सांगते. भूमीला अक्षयबरोबर काम केल्यानेच स्टारडम प्राप्त झाले, हे देखील ती विसरलेली नाही. 'टॉयलेट एक प्रेमकथा'च्यावेळी अक्षयने आपल्याला खूप सहकार्य केले आणि खूप मोलाचे मार्गदर्शनही केले आहे. विशेषतः जबाबदारीने रोल निभावण्यासाठी त्याच्या सूचना खूप मोलाच्या होत्या, असे भूमी म्हणाली.
भूमी 'सोन चिरैया' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तिने चंबळच्या खोऱ्यातील एका महिला दरोडेखोराची भूमिका साकारली आहे. या सिनेमात तिच्याबरोबर सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. चंबळच्या खोर्यात या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 'सोन चिरैया'चे चित्रीकरण सुरू असताना भूमीला शेखर कपूरच्या 'बॅन्डीट क्वीन'ची आठवण झाली होती. या रोलसाठी तिने तब्बल तीन महिने तयारी केली आहे. 'सोन चिरैया'तील तिचे शूटिंग संपल्याचे भूमीने इन्स्टाग्रामवर सांगितले आहे.
'सोन चिरैया' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे करत आहेत. १९७० च्या दशकातील कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे. भूमी पेडणेकर आणि सुशांत सिंग राजपूतसह मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.