'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:35 IST2025-11-03T13:35:00+5:302025-11-03T13:35:45+5:30
पिवळ्या कपड्यात अक्षय कुमार आणि काळ्या कपड्यात रुह बाबा..., दिग्दर्शक काय म्हणाले?

'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
'भूल भुलैया' हा बॉलिवूडमधला सुपरहिट हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाचे आतापर्यंत तीन भाग आले. पहिला भाग अक्षय कुमारच्या कॉमेडी आणि अभिनयामुळे आजही सर्वांच्या लक्षात आहे. तसंच विद्या बालननेही यामध्ये अप्रतिम काम केलं होतं. तर सिनेमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनने मन जिंकलं. आता सिनेमाच्या चौथ्या भागाची चर्चा आहे. विशेष म्हणजे 'भूल भुलैया ४'मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसतील अशी शक्यता आहे.
'भूल भुलैया'च्या यशानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात सगळ्यांनीच अक्षय कुमारची आठवण काढली. 'भूल भुलैया' म्हटलं की अक्षय कुमार अशीच छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी नुकतंच टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चौथ्या भागाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "भूल भुलैया ४'च्या स्क्रिप्टचं काम अजून सुरु झालेलं नाही. दुसरा आणि तिसरा भाग बनवलाय तर चौथाही बनेलच. चर्चा सुरु आहे पण अद्याप आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही. रुह बाबाच्या भूमिकेत कार्तिक आर्यनने आपली चांगली ओळख बनवली आहे त्यामुळे तो तर सिनेमात असलाच पाहिजे."
अक्षय कुमारही सिनेमात असणार का? यावर अनीस बज्मी म्हणाले, "हा खूपच चांगला विचार आहे. मध्यंतरी भूषण कुमारसोबत माझी चर्चा झाली होती. कार्तिक आणि अक्षयला एकत्र आणायचं का यावरही आम्ही बोललो होतो. पिवळ्या कपड्यात अक्षय आणि काळ्या कपड्यात कार्तिक मस्त दिसतील."
'भूल भुलैया'फ्रँचायझीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. २००७ साली पहिला भाग आला होता. यानंतर १५ वर्षांनी २०२२ साली दुसरा भाग आला. याच्या दोन वर्षांनी २०२४ साली तिसरा भाग रिलीज झाला. तीनही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.