बाळासाहेबांच्या नातवाची झेप, थेट YRF च्या बिग बजेट चित्रपटात झाली 'खलनायक' म्हणून एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:52 IST2025-11-20T13:50:08+5:302025-11-20T13:52:20+5:30
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू बॉलिवूड गाजवतोय.

बाळासाहेबांच्या नातवाची झेप, थेट YRF च्या बिग बजेट चित्रपटात झाली 'खलनायक' म्हणून एन्ट्री!
'ठाकरे' कुटुंबाची गेल्या अनेक दशकांपासून भारतीय राजकारणात एक प्रभावी ओळख आहे. बाळसाहेब ठाकरेंपासून सुरू झालेला हा राजकीय वारसा आज तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्य राजकारणात एक विशेष भूमिका बजावताना पाहिला मिळत आहे. पण, राजकारणापासून दूर जाऊन बाळासाहेबांचा नातू ऐश्वर्या ठाकरेनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं ऐश्वर्यला 'निशांची' या चित्रपटातून लाँच केलं. आपल्या डेब्यू चित्रपटात ऐश्वर्या डबल रोलमध्ये पाहायला मिळाला. 'निशांची'मध्ये त्याच्या प्रभावी अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. आता 'निशांची'नंतर ऐश्वर्यच्या हाती मोठा चित्रपट लागला आहे.
'निशांची'नंतर आता ऐश्वर्य थेट यश राज फिल्म्स (YRF) च्या एक बिग बजेट ॲक्शन-रोमान्स चित्रपटात झळकणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटात त्याला नकारात्मक भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्यचा सामना 'सैयारा' फेम स्टार अहान पांडे यांच्याशी होणार आहे.
ऐश्वर्य आणि अहान पांडे यांच्याशिवाय या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीचीही एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे शर्वरी वाघ. यश राज फिल्म्सच्या या ॲक्शन-रोमान्स चित्रपटात अहान पांडे, ऐश्वर्य ठाकरे आणि शर्वरी वाघ हे तीन उत्कृष्ट तरुण कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक अली अब्बास जफर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक रोलरकोस्टर राइड ठरवण्यासाठी अली अब्बास जफर कोणतीही कसर सोडणार नाहीत.