'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 21:27 IST2025-10-20T21:27:04+5:302025-10-20T21:27:56+5:30
Asrani Passes Away: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. जेव्हा 'शोले' चित्रपटाचा विषय येतो, तेव्हा त्यांची आठवण 'इंग्रजांच्या काळातला जेलर' या भूमिकेसाठी काढली जाते.

'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
Asrani Death: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांचे मूळ नाव गोवर्धन असरानी होते. त्यांचा जन्म १ जानेवारी, १९४१ रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे झाला होता. त्यांनी २० ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. 'ढोल', 'धमाल' आणि 'खट्टा मीठा' सारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. पण जेव्हा 'शोले' चित्रपटाचा विषय येतो, तेव्हा त्यांची आठवण 'इंग्रजांच्या काळातला जेलर' या भूमिकेसाठी केली जाते. रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' चित्रपटाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी अभिनेते असरानी यांनी त्यांच्या जेलरच्या भूमिकेबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
"अटेंशन! हमने कहा अटेंशन! कैदियों! कान खोलकर सुन लो, हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं..." हा डायलॉग 'शोले' चित्रपटातील अशा संवादांपैकी एक आहे, जो आजही खूप आवडतो. फक्त हा डायलॉगच नाही, तर या चित्रपटात 'इंग्रजांच्या काळातील जेलर'ची भूमिका साकारणारे असरानी देखील प्रेक्षकांना खूप आवडायचे. ही भूमिका साकारणाऱ्या असरानींचे म्हणणे होते की, या भूमिकेसाठी त्यांना हिटलरचे उदाहरण देण्यात आले होते. याबद्दल त्यांनी बीबीसी न्यूज हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की, लेखक सलीम-जावेद आणि दिग्दर्शक-निर्माता रमेश सिप्पी यांनी त्यांना एके दिवशी भेटीसाठी बोलावले होते. तेव्हा त्यांना 'शोले' चित्रपट किंवा जेलरच्या भूमिकेबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांना सांगण्यात आले होते की, एका जेलरची भूमिका आहे, जो स्वतःला खूप हुशार समजतो, पण तो तसा नाही, म्हणून त्याला आपण खूप चांगला जेलर आहोत हे दाखवावे लागते.
सुरूवातीला असरानींना वाटलेलं हिटलरची भूमिका साकारायची आहे, पण...
असरानी यांनी पुढे सांगितले होते की, "त्यांनी विचारले, 'हे कसे कराल?' मी म्हणालो की, जेलरचे कपडे घालू. ते म्हणाले, 'नाही'. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचे पुस्तक उघडले, त्यात हिटलरचे नऊ पोजेस होते." हिटलरचे पोज पाहून असरानी यांना वाटले की, त्यांना हिटलरची भूमिका करायची आहे, पण नंतर त्यांना समजावून सांगण्यात आले की, त्यांना हिटलरच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्यायचे आहे. ते पुढे म्हणाले होते की, "हिटलरचा आवाज रेकॉर्डेड आहे आणि जगातील सर्व प्रशिक्षण शाळांमध्ये, अभिनय अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला तो आवाज ऐकवला जातो." हिटलरच्या आवाजातील चढउतार 'शोले'मधील जेलरच्या डायलॉगमध्ये स्वीकारण्यात आले होते. आज भलेही असरानी आपल्यात नसले तरी, त्यांनी साकारलेले 'शोले'मधील जेलरचं पात्रं नेहमी आपल्यात राहतील आणि त्यांच्या आठवणी ताज्या करत राहतील.