"मराठ्यांच्या शौर्य गाथा...", छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाले ए.आर. रहमान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:12 IST2025-02-07T10:12:17+5:302025-02-07T10:12:33+5:30
'छावा' चित्रपटातील 'आया रे तूफान' हे गाणे प्रदर्शित झालं. काही तासांमध्ये युट्युबवर या गाण्याने लाखो व्ह्युव्हज मिळवले.

"मराठ्यांच्या शौर्य गाथा...", छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाले ए.आर. रहमान?
A.r. Rahman: सध्या सर्वत्र 'छावा' (Chhaava) चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'छावा' चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल प्रदर्शित झालेलं या चित्रपटाचं 'आया रे तूफान' हे नवीन गाणे प्रेरणादायी आहे. हे गाणे केवळ ए.आर. रहमान यांनीच संगीतबद्ध केलेले नाही तर त्यांनी गायले आहे.
ए.आर. रहमान यांनी या गाण्याचे वर्णन एका युगाची हाक म्हणून केलं आहे. राजेंच्या शक्ती आणि शौर्याचे सार दाखवण्यात हे गाणं यशस्वी झाल्यानं ए.आर. रहमान यांनी आनंद व्यक्त केला. ए.आर. रहमान म्हणाले, 'आया रे तूफान हे एका युगाचे आवाहन आहे, "ही छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली आहे. जेव्हा मी हे गाणे बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मराठ्यांच्या शौर्याची गाथा सर्वात भव्य स्वरूपात समोर आणण्याचा माझा विचार होता". चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल म्हणाला, "आया रे तूफान ही निसर्गाची एक आदिम शक्ती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र वारशाचा सन्मान करण्यासाठी सेटवरील प्रत्येक व्यक्तीने मनापासून काम केले आहे. आमच्यासाठी ते फक्त एक गाणे नाही, तर ती एक जबाबदारी होती"
छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला समर्पित असं 'आया रे तुफान' हे दुसरं गाणं भेटीला आलंय. अंगावर शहारा आणणारं हे गाणं आणि या गाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.गाण्याची चाल आणि प्रत्येक शब्द ऐकताना आणि प्रत्यक्षात हे गीत पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो असं म्हणणं गैर ठरणार नाही. 'भगवे की शान से चमका आसमान', अशा सुंदर शब्दांनी 'आया रे तुफान' गाणं सजलेलं दिसतं. इर्शाद कामिल, क्षितीज या दोघांनी 'आया रे तुफान' गाण्याचे शब्द लिहिले असून ए. आर. रहमान यांनीच या गाण्याला संगीत दिलं आहे.
'छावा' चित्रपटात 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. महाराजांच्या दरबारात सुव्रत जोशी, आशिष पाथोडे, किरण करमरकर आणि सारंग साठ्ये पाहायला मिळाले. 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' गाण्यामध्ये शुभंकर एकबोटे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर हे कलाकार पाहायला मिळाले. विकी आणि रश्मिकाशिवाय या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे.