"मी भाजपचा माणूस..." अनुपम खेर राजकीय भूमिकेवर थेट बोलले, मोंदीचं कौतुक करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:33 IST2025-09-25T10:33:03+5:302025-09-25T10:33:40+5:30
अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महान नेते संबोधत त्यांचं कौतुक केलं.

"मी भाजपचा माणूस..." अनुपम खेर राजकीय भूमिकेवर थेट बोलले, मोंदीचं कौतुक करत म्हणाले...
Anupam Kher on Pm Narendra Modi: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच देशातील आणि बॉलिवूडमधील विविध विषयांवर स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत आपल्या राजकीय विचारांवर आणि त्यांना 'भाजप समर्थक' का म्हटले जाते, यावर दिलखुलासपणे भाष्य केले आहे. तसेच अनुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महान नेते संबोधत त्यांचं कौतुक केलं.
अनुपम खेर यांनी 'इंडियन एक्सप्रेस'च्या 'एस्प्रेसो' या कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. "भारताबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला राजकारणात येण्याची इच्छा आहे, असा चुकीचा अर्थ काढतात", असे अनुपम खेर म्हणाले. ते म्हणाले की, "माझा जन्म १९५५ साली झाला आणि भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. मी भारतापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे आणि आम्ही दोघे एकत्र वाढलो. त्यामुळे मी जन्मतःच राष्ट्रवादी आहे. ते म्हणतात की राष्ट्रवादी असणे हे देशभक्त असण्यापेक्षा वेगळे आहे, पण मला ते समजत नाही", असे त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "मी परिणामांची चिंता न करता नेहमी भारताच्या बाजूने बोलतो आणि लोक याला राजकारण मानतात. २०१४ नंतरच आम्ही आमच्या आवडी-निवडींबद्दल खूप मोकळे झालो". आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले की, "आता मला काही फरक पडत नाही. लोक म्हणतात की मी भाजपचा माणूस आहे, पण मला एक निष्ठावंत भारतीय असण्याची लाज वाटत नाही. जेव्हा कोणी भारताची प्रशंसा करतो, तेव्हा मला अभिमान वाटतो", असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महान नेते संबोधताना ते म्हणाले की, "आमचे वडील किंवा मित्रांशीही मतभेद होतात. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्या व्यक्तीचा अनादर करतो. मी त्यांच्या हेतूने खूप प्रभावित झालो आहे. इतक्या शत्रूंनी घेरलेले असतानाही ते देशासाठी काम करत आहेत", असे म्हणत अनुपम खेर यांनी मोदींची प्रशंसा केली.