'माझ्या करिअरची अशी अवस्था झाली होती की, कोणी...'; 'अॅनिमल'मुळे सावरलं बॉबीचं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:28 IST2023-11-26T13:27:56+5:302023-11-26T13:28:16+5:30
Bobby deol: बॉबीच्या आयुष्यात असा एक काळ आला होता जेव्हा त्याला काम मिळणं बंद झालं होतं.

'माझ्या करिअरची अशी अवस्था झाली होती की, कोणी...'; 'अॅनिमल'मुळे सावरलं बॉबीचं करिअर
सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूरच्या (Ranbir kapoor) 'अॅनिमल' (animal) या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधीळ उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात रणबीरसह रश्मिका मंदाना आणि बॉबी देओलदेखील झळकले आहेत. हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर बॉबी देओलने (Bobby deol) त्याच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. यावेळी बेरोजगारीच्या दिवसांमुळे मला काम मिळालं, असं म्हणत बॉबीने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
"सगळ्यात पहिले मी संदीपचे आभार मानू इच्छितो. कारण, माझ्या करिअरची अशी अवस्था झाली होती जी पाहून मला कोणी असा रोल देईल असा विचारही मी केला नव्हता. एक दिवस मला अचानक संदिपचा मेसेज आला, 'मला तुझी भेट घ्यायची', असं त्या मेसेजमध्ये होतं. सुरुवातीला मला वाटलं कोणी तरी मस्करी करतंय. पण मी जरा शोध घेतला तेव्हा कळलं की खरंच तो संदीपचाच नंबर आहे. मग मी फोन केला आणि भेटायचं ठरवलं", असं बॉबी म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी त्याने माझा एक फोटो दाखवला. त्यावेळी माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्यावेळी मी सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळायचो. त्यावेळचा माझा तो फोटो होता. ज्यात मी कुठे तरी दूरवर पाहातोय. हा फोटो दाखवत, यासाठीच मला तुला सिनेमात घ्यायचंय असं त्याने सांगितलं. या फोटोत तुझे जे एक्स्प्रेशन्स आहेत ते मला सिनेमात हवेत. त्यावेळी असं वाटलं चला बेरोजगारीचे दिवस उपयोगी आले. तर अशा प्रकारे मला हा सिनेमा मिळाला."
दरम्यान, बॉबी देओलने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यात गुप्त, सोल्जर या सिनेमांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. परंतु, कालांतराने त्याला काम मिळणं बंद झालं. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या हातून सिनेमा कसे निसटत गेले हे सांगितलं.