रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमात झळकला मराठमोळा अभिनेता, साकारलीये महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:28 IST2023-12-01T16:27:37+5:302023-12-01T16:28:52+5:30
रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ॲनिमल'मध्ये मराठमोळा अभिनेताही झळकला आहे.

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमात झळकला मराठमोळा अभिनेता, साकारलीये महत्त्वाची भूमिका
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बहुप्रतीक्षीत असलेला रणबीरचा हा सिनेमा अखेर आज (१ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'ॲनिमल'मधील रणबीरचा लूक पाहूनच प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या 'ॲडव्हान्स बुकिंगलाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ॲनिमल'मध्ये मराठमोळा अभिनेताही झळकला आहे.
'ॲनिमल'मधील भूमिकेसाठी रणबीरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, त्याबरोबरच चित्रपटात छोट्याशा भूमिकेत असलेल्या मराठी अभिनेत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'मध्ये मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी रणबीरला शस्त्र पुरविणाऱ्या फ्रेडीची भूमिका साकारली आहे. शस्त्रांचा डिलर असलेल्या फ्रेडीच्या कॉमेडीने चित्रपटातील 'ॲक्शन सीन्सला रंगत आणली आहे. या सिनेमात उपेंद्र लिमयेंनी रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी साकारलेली छोटेखानी भूमिका लक्षवेधी ठरत आहे.
उपेंद्र लिमये यांनी या आधीही अनेक हिंदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'अंतिम द फायनल ट्रुथ', '२००- हल्ला हो', 'बंसुरी', 'सरकार राज', 'चांदनी बार', 'पेज ३' या बॉलिवूड सिनेमांत ते झळकले आहेत. दरम्यान, 'ॲनिमल' सिनेमाने प्रदर्शनाआधीच ॲडव्हान्स बुकिंगमधून २० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रणबीर कपूरचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.