Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:54 IST2025-11-13T10:52:24+5:302025-11-13T10:54:45+5:30
प्रकृतीने अस्वस्थ असलेल्या धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी अमिताभ बच्चन स्वत: गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन
पडद्यावरील 'जय' आणि 'वीरू' अर्थात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यातली मैत्री आजही तितकीच घट्ट आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. नुकतंच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या धर्मेंद्र यांची तब्येत विचारण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी बिग बी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले.
धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी पोहोचले अमिताभ बच्चन
धर्मेंद्र यांना नुकतंच मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या भेटीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले, कारण त्यांनी कोणतेही बॉडीगार्ड सोबत न घेता अगदी शांतपणे स्वतः गाडी चालवत मित्राच्या घरी जाणे पसंत केले. बिग बी दुपारी ४ च्या सुमारास त्यांच्या कारमधून धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचले. त्यांचा हा साधा आणि नम्र स्वभाव पाहून उपस्थित लोक आणि चाहते थक्क झाले. सोशल मीडियावर त्यांचे स्वतः गाडी चालवत येतानाचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात त्यांच्या प्रायव्हसीचा आदर राखण्याची विनंती केली आहे. दरम्यान अमिताभ बच्चन त्यांच्या खास मित्राला भेटायला आले असल्याने लोकांना पुन्हा एकदा 'शोले' सिनेमामधील जय आणि वीरुची आठवण आली.
धर्मेंद्र यांची प्रकृती कशी?
८९ वर्षीय धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, त्यांच्यावर आता घरीच उपचार होणार आहेत. देओल कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, गोविंदा यांच्यासह अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. धर्मेंद्र लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी चाहते प्रार्थना करत आहेत.