Video: अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरमध्ये रंगला 'फिंगर क्रिकेट'चा सामना, कोण जिंकलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:29 IST2026-01-13T13:22:22+5:302026-01-13T13:29:58+5:30
एक लीगदरम्यान बिग बी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात फिंगर क्रिकेटचा मजेशीर सामना रंगला. या सामन्यात कोणी बाजी मारली? जाणून घ्या

Video: अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरमध्ये रंगला 'फिंगर क्रिकेट'चा सामना, कोण जिंकलं?
बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन आणि क्रिकेट जगतातील 'नायक' सचिन तेंडुलकर जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तो क्षण चाहत्यांसाठी खास असतो. नुकताच सोशल मीडियावर अशाच एका खास क्षणाचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन चक्क सचिन तेंडुलकरसोबत 'फिंगर क्रिकेट' खेळताना दिसत आहेत. या दोन दिग्गजांना लहान मुलांसारखं खेळताना पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे
हा मजेशीर प्रसंग 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग' (ISPL) च्या निमित्ताने पाहायला मिळाला. अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून, त्याला "क्रिकेटच्या देवासाेबत फिंगर क्रिकेट खेळताना" असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, दोघेही खूप उत्साहात आहेत आणि एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा अमिताभ बच्चन खेळताना बाद होतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत निरागस आणि मजेशीर आहेत, ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
T 5623(i) - playing finger cricket with the God of Cricket pic.twitter.com/dmplM1RoQL
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 12, 2026
पुढे दोघांमध्ये तीन सीरिजची फिंगर क्रिकेट मॅच रंगते. पहिल्या मॅचमध्ये अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकरला आऊट करतात. दुसऱ्या मॅचमध्ये अमिताभ जिंकतात. शेवटी तिसऱ्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर रन्स करत असतो. तेवढ्यात त्याचा आणि अमिताभ यांचा स्कोर समान होतो. त्यामुळे अमिताभ म्हणतात, ''ही मॅच टाय झाली म्हणून घोषित करा आणि अर्धी ट्रॉफी मला आणि अर्धी यांना देऊन टाका.''
या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. चाहत्यांनी "दोन महान व्यक्ती एकाच फ्रेममध्ये" अशा भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी आपल्या बालपणीच्या फिंगर क्रिकेटच्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींनी हा आजच्या दिवसातील इंटरनेटवरचा सर्वात 'क्युट' व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. या दोन दिग्गजांमधील मैत्री आणि आपुलकी पाहून चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे.