आलिया भट अन् शर्वरी वाघ काश्मीरच्या खोऱ्यात करणार शूटिंग, Alpha सिनेमाची वाढली उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:25 IST2024-08-24T15:22:33+5:302024-08-24T15:25:42+5:30
अल्फा गर्ल्स! काश्मीरच्या खोऱ्यात करणार शूट

आलिया भट अन् शर्वरी वाघ काश्मीरच्या खोऱ्यात करणार शूटिंग, Alpha सिनेमाची वाढली उत्सुकता
अभिनेत्री शर्वरी वाघने (Sharvari Wagh) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आधी 'मुंज्या' मधील दमदार परफॉर्मन्सनंतर ती 'महाराज' मध्ये झळकली. तर नुकताच तिचा 'वेदा' सिनेमा रिलीज झाला. एकामागोमाग रिलीज झालेल्या तीनही सिनेमांमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. शर्वरी आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स मधील 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती आलिया भटसोबत (Alia Bhat) अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. लवकरच आलिया आणि शर्वरी काश्मीरला शूटसाठी जाणार आहेत.
'अल्फा' हा यशराज बॅनर अंतर्गत स्पाय युनिव्हर्सचा भाग असणारा सिनेमा आहे. अल्फा मध्ये अभिनेते नाही तर आलिया आणि शर्वरी या दोन अभिनेत्रींची पॉवर, अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. सिनेमाचं पहिलं शेड्युल मुंबईतच सुरु होतं जे काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं. आता पुढच्या शेड्युलसाठी आलिया आणि शर्वरी काश्मीरला जाणार आहेत. तेथील सुंदर वातावरणात अॅक्शन सीन्स रंगणार आहेत.
२६ ऑगस्टपासून 'अल्फा'चं पुढील शेड्युल सुरु होत आहे. यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचं शर्वरी म्हणाली. एका मुलाखतीत ती म्हणाली, "मी अल्फा सिनेमाच्या सेटवर जाण्यासाठी खूपच आतुर आहे. हे शेड्युल खूप रोमांचक असणार आहे. काही काळ मुंबईत शूट केल्यानंतर आता आम्ही काश्मीरला जाण्यासाठी तयार आहोत."
शर्वरीने 'बंटी और बबली 2' मधून अभिनयाला सुरुवात केली. आतापर्यंत तिने साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. 'मुंज्या' सिनेमाने तर १०० कोटींचा व्यवसाय केला. शर्वरीचं बॉलिवूडमध्ये नशीब चमकलं आहे.