'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:47 IST2025-12-18T08:43:45+5:302025-12-18T08:47:16+5:30
अक्षय खन्नाने अखेर धुरंधर निमित्त त्याला जे प्रेम मिळतंय त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय खन्ना काय म्हणाला?

'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटातील 'रेहमान डकैत' या भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, इतकी प्रसिद्धी मिळूनही अक्षय खन्नाने आतापर्यंत मौन बाळगले होते. अखेर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी अक्षयची या यशावर असलेली पहिली प्रतिक्रिया उघड केली आहे.
मुकेश छाबडा यांनी जेव्हा अक्षयशी संवाद साधला आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल सांगितले, तेव्हा तो नेहमीप्रमाणेच शांत होता. या यशाने तो अजिबात हुरळून गेलेला दिसला नाही. त्याने अगदी सहजपणे मोजकीच प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला "हा, मजा आली" असं म्हणत अक्षयने आपली भावना व्यक्त केली. अक्षयने आपल्या कामात किती मेहनत केली आहे आणि किती जीव ओतला आहे याची त्याला जाणीव असते, त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यानंतर पुढे काय होईल याची तो चिंता करत नाही, असेही छाब्रा यांनी नमूद केले.
अक्षय खन्नाच्या अभिनयाची प्रशंसा करताना मुकेश छाब्रा म्हणाले की, ''अक्षय हा एक असा अभिनेता आहे ज्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि ओरिजिनल आहे. तो कोणाचीही नक्कल करत नाही. सेटवर तो स्वतःच्या विश्वात असतो, आपले सीन अनेकदा वाचतो आणि पूर्ण तयारीनिशी समोर येतो. हीच तयारी आणि त्याचे वेगळेपण त्याच्या कामातून दिसून येते, ज्यामुळे प्रेक्षक त्याच्या भूमिकेच्या प्रेमात पडतात.''
'धुरंधर' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी अक्षय खन्नाच्या अभिनयाला दाद दिली आहे. अनेकांच्या मते, या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेत असलेल्या रणवीर सिंगवरही मात केली आहे. अक्षयचे एन्ट्री सीन्स आणि त्याचे हावभाव सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून त्यावर अनेक मीम्सही बनवले जात आहेत.
विशेष म्हणजे, चित्रपटाच्या या अफाट यशाचा उत्सव साजरा करण्याऐवजी अक्षय सध्या अलिबाग येथील आपल्या घरी निवांत वेळ घालवत आहे. त्याने नुकतेच तिथे वास्तुशांती पूजा केली असून, तो सध्या प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर आहे. दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.