प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्ना दिसणार? जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:49 IST2026-01-15T13:43:40+5:302026-01-15T13:49:41+5:30
'धुरंधर २' सिनेमात आता अक्षय खन्नाही दिसणार आहे. सिनेमाच्या टीमने अक्षयला घेऊन शूटिंगही सुरु केल्याची चर्चा आहे

प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्ना दिसणार? जाणून घ्या सविस्तर
'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेली 'रेहमान डकैत' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. सोशल मीडियावर या पात्राची प्रचंड चर्चा झाली आणि चाहत्यांनी त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धर यांनी 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्नाला पुन्हा एकदा सिनेमात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
चित्रपटात काय बदल होणार?
'धुरंधर २'चे मुख्य चित्रीकरण आधीच पूर्ण झाले होते, मात्र आता अक्षय खन्नासाठी काही खास सीन पुन्हा शूट केले जाणार आहेत. पहिल्या भागात रेहमान डकैतचा मृत्यू झाला होता, त्यामुळे दुसऱ्या भागात तो नक्की कसा दिसणार, याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'फ्लॅशबॅक'च्या माध्यमातून रहमान डकैतचं आधीचं आयुष्य आणि त्याचा गुंड बनण्यापर्यंतचा एकूण प्रवास दाखवला जाण्याची शक्यता आहे.
अक्षय खन्नाने 'धुरंधर' सिनेमातील Fa9la गाण्यावर केलेला डान्स आणि त्याच्या अभिनयाचा अंदाज यामुळे सोशल मीडियावर अक्षय तुफान व्हायरल झाला होता. या लोकप्रियतेचा विचार करून निर्मात्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, चाहत्यांच्या प्रेमापोटी मेकर्सने कथेमध्ये बदल करून अक्षय खन्नाच्या दमदार पात्राला पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याची तयारी केली आहे. आता खरंच असं घडलंय का, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.