"हम भी घुसकर मार सकते है", भारत-पाकिस्तान हवाई युद्धाची गोष्ट; अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:54 IST2025-01-05T12:53:32+5:302025-01-05T12:54:12+5:30
'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

"हम भी घुसकर मार सकते है", भारत-पाकिस्तान हवाई युद्धाची गोष्ट; अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
नव्या वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर हा सिनेमा आधारित आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
'स्काय फोर्स' सिनेमात अक्षय कुमार भारताच्या हवाई दलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. २ मिनिटे ४९ सेकंदाच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर खिळवून ठेवणारा आहे. या सिनेमात अक्षयसोबत वीर पहारियादेखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर भारताच्या हवाई दलाकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केलं जातं. पण, या मिशनमध्ये एक सैनिक हरवत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. 'स्काय फोर्स' सिनेमातून प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार आहे.
'स्काय फोर्स' सिनेमात अक्षय कुमार आणि वीर पहारियासोबत सारा अली खान, निम्रत कौर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शरद केळकरही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर 'स्काय फोर्स' सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. २४ जानेवारीला 'स्काय फोर्स' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.