मतदान केंद्रावर अक्षय कुमारसमोर तरुणीने जोडले हात, म्हणाली "वडिलांवर कर्ज आहे, मदत करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:05 IST2026-01-15T13:04:57+5:302026-01-15T13:05:29+5:30
मतदान करून बाहेर येत असतानाच एका तरुणीने अक्षयला गाठले आणि आर्थिक मदतीची विनंती केली.

मतदान केंद्रावर अक्षय कुमारसमोर तरुणीने जोडले हात, म्हणाली "वडिलांवर कर्ज आहे, मदत करा"
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळीच अक्षय कुमारने जुहू येथील गांधी शिक्षण भवन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर येत असतानाच एका तरुणीने अक्षयला गाठले आणि आर्थिक मदतीची विनंती केली. या कठीण प्रसंगात अक्षयने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
मतदान केंद्राबाहेर पडताना एक तरुणी हातात कागद घेऊन अक्षयकडे आली. तिने रडत रडत आपली कैफियत मांडली. "माझ्या वडिलांवर खूप कर्ज आहे, कृपया आम्हाला मदत करा" असं ती म्हणाली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी सुरुवातीला तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण अक्षयने त्यांना थांबवले. अक्षयने शांतपणे त्या मुलीचे बोलणे ऐकून घेतले आणि तिला सांगितले, "तुझा नंबर मला दे आणि माझ्या ऑफिसमध्ये ये, आपण पाहूया काय करता येईल".
अक्षयचे हे शब्द ऐकून ती मुलगी भावुक झाली आणि तिने त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयने तिला लगेच रोखले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अक्षय कुमारच्या या दिलदारपणाचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.