अहान पांडेचा 'सैयारा' बिग बजेट चित्रपटांवर पडतोय भारी! दोन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:43 IST2025-07-20T09:39:42+5:302025-07-20T09:43:21+5:30
अहान पांडेचा सैयारा ठरतोय बिग बजेट चित्रपटांपेक्षा वरचढ! दोन दिवसांतच गाजवलं बॉक्स ऑफिस; कमाई किती?

अहान पांडेचा 'सैयारा' बिग बजेट चित्रपटांवर पडतोय भारी! दोन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Saiyaara Box Office Collection: 'आशिकी-२', 'आवारापन' आणि 'एक व्हिलन' अशा चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक मोहित सुरी नवी कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या चित्रपटाचं नाव आहे सैयारा (Saiyaara). शब्द आणि सुरांनी सजलेली उत्कट प्रेमकथा 'सैयारा'मध्ये पाहायला मिळतेय. या प्रेमकथेचा नायिक अहान पांडे (Ahan Pandey) आहे तर नायिकेची भूमिका अनीत पड्डाने साकारली आहे. बॉलिवूडमधील या नवीन रोमँटिक जोडप्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. अलिकडेच १८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता या चित्रपटाने २ दिवसात बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं? जाणून घ्या...
'सैयारा'च्या निमित्ताने पुन्हा एक प्रेमकथा बॉलिवूडला गवसली आहे. आपल्या आवाजाला ओळख मिळावी यासाठी कायम प्रयत्नशील असलेला क्रिश कपूर प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता 'सैयारा'चा दुसऱ्या दिवसाचा कलेक्शन रिपोर्टही समोर आला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, काल १९ जुलै च्या दिवशी चित्रपटाने २४ कोटींची कमाई केली. दोन दिवसांत 'सैयारा'ने एकूण ४५ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो.
अहान पांडे हा चंकी पांडेचा धाकटा भाऊ चिक्की पांडे म्हणजेच शरद पांडेचा मुलगा आहे. चिक्कीची गणना मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींमध्येही केली जाते. आहान बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत येण्याची तयारी करत होता. यासाठी तो दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्याकडून प्रशिक्षण घेत होता. अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने यश राज यांच्या 'द रेल्वे मॅन' या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता अहानचं पदार्पण विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.