Adipurush Trailer : 'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 15:15 IST2023-05-09T14:40:40+5:302023-05-09T15:15:14+5:30
सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून त्याची छोटीच झलक बघायला मिळत आहे.

Adipurush Trailer : 'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल!
दिग्दर्शक ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' सिनेमाचा दमदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. काही वेळापूर्वीच कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. 'जय श्रीराम'च्या जयघोषात मोठ्या पडद्यावर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची कहाणी पाहण्याचा अनुभव रोमांचक असणार आहे. सिनेमातील व्हीएफएक्स, प्रभास आणि क्रिती सेननचा लुक यावर काम केल्याचं दिसून येतंय. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून त्याची छोटीच झलक बघायला मिळत आहे.
'आदिपुरुष' चा ३ मिनिटांचा हा ट्रेलर अतिशय दमदार आहे. ट्रेलरला अर्ध्या तासातच १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकताच तुम्हीही भारावून जाल. तर ट्रेलरच्या अगदी शेवटी शंकराच्या पिंडीसमोर रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानची फक्त एक झलक दिसते जी उत्सुकता वाढवणारी आहे. तसंच शबरी, जटायू अशी इतर लहान पात्रही लक्ष वेधून घेणारी आहेत. 16 जून रोजी सिनेमा चित्रपगृहात 3D मध्ये रिलीज होणार आहे.
अभिनेता प्रभास (Prabhas) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) च्या बहुप्रतिक्षित "आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून तो चित्रपट वादात अडकला होता. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला होता. पण आता ट्रेलर पाहिल्यावर अनेक चुका दुरुस्त केल्याचं दिसून येत आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास उठून दिसतोय तर सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन सुंदर दिसत आहे. याशिवाय मराठमोळ्या देवत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.