"हा आपला देश आहे, येथे शांततेने राहा..."; वहीदा रहमान यांची ए.आर.रहमानच्या 'त्या' वक्तव्यावर स्पष्ट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 09:54 IST2026-01-27T09:48:45+5:302026-01-27T09:54:58+5:30
ए. आर. रहमानने बॉलिवूडमध्ये सध्या धार्मिक भेदभावामुळे त्यांना काम मिळत नाहीये, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे

"हा आपला देश आहे, येथे शांततेने राहा..."; वहीदा रहमान यांची ए.आर.रहमानच्या 'त्या' वक्तव्यावर स्पष्ट प्रतिक्रिया
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानने अलीकडेच बॉलिवूडमध्ये होत असलेल्या भेदभावावर आणि सध्या मिळत असलेल्या कामाच्या कमतरतेवर भाष्य केले होते. त्याच्या या विधानामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. आता या वादावर दिग्गज अभिनेत्री वहीदा रहमान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान ए. आर. रहमानला उद्देशून काय म्हणाल्या?
वहीदा रहमान काय म्हणाल्या?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वहीदा रहमान यांनी या विषयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "हे लहान-मोठे प्रकार प्रत्येक देशात आणि प्रत्येक क्षेत्रात घडत असतात. आपण या गोष्टींमध्ये किती आणि का पडावे? हा आपला देश आहे, येथे शांततेने राहा आणि आनंदी राहा."
वहिदा रहमान यांनी पुढे कामाच्या कमतरतेवर बोलताना सांगितले की, "चित्रपटसृष्टीत यश आणि काम मिळणं यात नेहमीच चढ-उतार येत असतात. एका ठराविक काळानंतर लोक नवीन चेहऱ्यांना संधी देऊ पाहतात, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एखादा माणूस उंचीवर पोहोचला की तो कायम तिथेच राहील असे नसते. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याला सकारात्मकतेने स्वीकारायला हवे."
वहीदा शेवटी म्हणाल्या की, "माझ्या वयात मी अशा वादांपासून लांब राहणेच पसंत करते. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, हे ठरवणे कठीण असते. त्यामुळे आपण आपली शांतता जपली पाहिजे आणि या देशावर प्रेम केले पाहिजे."
ए. आर. रहमानचं वक्तव्य काय?
ए. आर. रहमानने एका मुलाखतीत म्हटले होते की, गेल्या ८ वर्षांत बॉलिवूडमध्ये कामाच्या बाबतीत त्याच्यासोबत भेदभाव झाला आहे. त्याला जे काम मिळतंय त्याचं प्रमाण कमी झालं असून, यामागे धार्मिक भेदभाव असू शकतो. अशी शंका त्याने व्यक्त केली होती. याशिवाय बॉलिवूडची पॉवर आता अशा लोकांच्या हातामध्ये आहे, जे अजिबात क्रिएटिव्ह नाहीत, असंही रहमान म्हणाला होता. "काही लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, ज्यामुळे मला चित्रपटासाठी काम मिळणे कठीण झाले आहे.", अशी रहमानने प्रतिक्रिया दिली.