"मी तुमचं एखादं गाणं..."; आशा भोसलेंसाठी तब्बूने लिहिलेली भावुक पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:32 IST2026-04-12T10:30:29+5:302026-04-12T10:32:33+5:30
आशा भोसले यांना छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बू हिने आशाताईंची एक खास आठवण जागवली

"मी तुमचं एखादं गाणं..."; आशा भोसलेंसाठी तब्बूने लिहिलेली भावुक पोस्ट व्हायरल
आशा भोसले यांना छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आशाताई या आजारपणातून लवकरात लवकर बऱ्या होतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दरम्यान बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बू हिने आशाताईंची एक खास आठवण जागवली. आशा ताईंनी तब्बूला तिच्या वाढदिवसानिमित्त एक 'गिटार' भेट म्हणून दिली आहे, ज्यामुळे तब्बू भारावून गेली आहे.
तब्बूने सोशल मीडियावर आशा भोसले यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले असून या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवसांबद्दल मला सांगायचंय... असा क्षण जो मी कधीही विसरणार नाही. ज्या गोष्टीने मला सर्वात जास्त भावुक केलंय... माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेव...''
''नोव्हेंबरमध्ये माझा वाढदिवस होता आणि अचानक मला ही सुंदर भेट देण्यात आली... ही गिटार... आशाजींनी मला दिलेली ही प्रेमळ भेट. माझ्या मनातील कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतील... आशाजी, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि मला तुमचा किती आदर वाटतो, हे मी शब्दांत सांगूच शकत नाही. तुमच्या गाण्यांमधून आम्ही प्रेम, ओढ, वेदना आणि उत्कटता अनुभवली आहे.''
तब्बू शेवटी लिहिते, ''ही गिटार मी आयुष्यभर जपून ठेवेन आणि मला आशा आहे की, लवकरच एखाद्या दिवशी मी याच गिटारवर तुमचं एखादं गाणं तुम्हाला वाजवून दाखवेन.'' बॉलिवूडमध्ये तब्बू आणि आशा भोसले यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे मानले जाते. तब्बूने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर आशा ताईंचे स्वर आजही चाहत्यांना मंत्रमुग्ध करतात.
आशाताईंच्या प्रकृतीबद्दल नात काय म्हणाली?
आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, "माझी आजी, आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही विनंती करतो की, कृपया आमच्या खासगीपणाचा आदर करावा. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आम्ही तुम्हाला सकारात्मक माहिती देत राहू."