"आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग..."; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:29 IST2025-12-16T12:25:32+5:302025-12-16T12:29:34+5:30
श्रद्धा कपूरने 'धुरंधर' सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली श्रद्धा? जाणून घ्या

"आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग..."; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
बॉलिवूडमध्ये सध्या दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' (Dhurandhar) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमार, विक्की कौशल, हृतिक रोशन, अल्लू अर्जुन आणि सामंथा रुथ प्रभू यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशातच श्रद्धा कपूरने 'धुरंधर' पाहिल्यानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली श्रद्धा?
श्रद्धा कपूरची खास विनंती
श्रद्धाने कपूरने 'धुरंधर' पाहिल्यानंतर तिची वेगळी नाराजी व्यक्त केली. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, “आदित्य धरने 'धुरंधर' बनवून खरंच खूप वाईट केले आहे, कारण दुसऱ्या भागासाठी त्यांनी आम्हाला तीन महिने वाट पाहायला लावली आहे. आमच्या भावनांशी खेळू नका! कृपया दुसरा भाग लवकर प्रदर्शित करा. 'धुरंधर' एक उत्कृष्ट अनुभव आहे, जर सकाळी शूटिंग नसती तर लगेच जाऊन चित्रपट पुन्हा पाहिला असता'', असं ती म्हणाली.
नकारात्मक पीआरवरही भाष्य
'धुरंधर' चित्रपटाला रिलीजपूर्वी नकारात्मक प्रसिद्धी आणि काही वादविवादांचा सामना करावा लागला होता. याबद्दल बोलताना श्रद्धा कपूरने आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमचा उल्लेख केला. श्रद्धा म्हणाली, “यामी गौतमला नकारात्मक पीआर आणि काही वादांना सामोरे जावे लागले, पण 'धुरंधर'ने या सगळ्यावर मात करत बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोणतीही वाईट गोष्ट एका चांगल्या चित्रपटाला अपयशी करु शकत नाही. आम्हाला प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे.”
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा दबदबा
आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन केले आहे. 'धुरंधर'ने केवळ ११ दिवसांत ३७९.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, आणि जागतिक स्तरावरही 'धुरंधर' उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबतअक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त आणि राकेश बेदी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.