पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 4, 2025 14:57 IST2025-07-04T14:57:09+5:302025-07-04T14:57:36+5:30
सध्या पंचायत ४ वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांची चांगलीच चर्चा आहे. नीना गुप्तांनी वैयक्तिक आयुष्यात रोखठोक विधान करत तरुणांना मोलाचा सल्ला दिलाय.

पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.."
अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या 'पंचायत ४' वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. 'पंचायत ४'मधील मंजु देवीच्या भूमिकेत नीना गुप्तांनी पुन्हा एकदा लक्षवेधी काम केलंय. ऑन स्क्रीन उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या नीना गुप्ता रिअल लाईफमध्ये आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रेमापेक्षा मला गिफ्ट्स अधिक महत्त्वाची वाटतात.” त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. नेमक्या काय म्हणाल्या नीना?
प्रेम दाखवायला काहीतरी लागतं
नीना गुप्ता म्हणाल्या की, "आजकाल केवळ भावना पुरेशा नाहीत, तर त्या दाखवण्यासाठी कृती आवश्यक असते. तुम्ही म्हणता की तुम्ही मला प्रेम करता, पण तुम्ही काहीच देत नाही, तर मला ते प्रेम समजत नाही. प्रेम दाखवायला काहीतरी द्यावं लागतं, ते गिफ्ट असो, वेळ असो, किंवा समोरच्या व्यक्तीकडे दिलेलं लक्ष. मला माझ्या बँक खात्यात पैसे दिसले की शांती वाटते. लोक म्हणतात, प्रेम सगळं काही असतं. पण मी म्हणते, पैसे असले की प्रेम टिकतं. मुलांना चुकीचे संदेश देऊ नका की पैसा वाईट आहे. पैसे खूप महत्त्वाचे आहेत.”
नीना गुप्ता यांनी याआधी अनेकदा आपले आर्थिक आणि वैयक्तिक संघर्ष उघडपणे मांडले आहेत. ‘बधाई हो’ या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली. त्यांचं म्हणणं आहे की, "स्वतः कमवणं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं हे स्त्रीसाठी अत्यंत आवश्यक आहे". करीना कपूरच्या मुलाखतीदरम्यान नीना यांनी ही मतं मांडली. करिनानेही त्यांच्या मताशी सहमती दर्शवत, “मी हेच माझ्या मुलांना शिकवते,” असं सांगितलं. नीना गुप्ता यांची भूमिका असलेला 'मेट्रो इन दिनो' हा सिनेमा आणि 'पंचायत ४' ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे.