पुरणपोळी दिली, हातात हात घेतला अन्...; दीपिका पादुकोणने घेतली मराठी आईची भेट; अभिनेत्रीच्या साधेपणाने जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:50 IST2026-01-06T13:46:17+5:302026-01-06T13:50:58+5:30
पडद्यावरची मस्तानी दीपिका पादुकोण खऱ्या आयुष्यातही किती नम्र आणि प्रेमळ आहे, याचा अनुभव नुकताच आला. सामान्य मध्यमवर्गीय घरातील आईचा दीपिकासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलंय

पुरणपोळी दिली, हातात हात घेतला अन्...; दीपिका पादुकोणने घेतली मराठी आईची भेट; अभिनेत्रीच्या साधेपणाने जिंकलं मन
बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या साध्या स्वभावासाठीही ओळखली जाते. नुकताच दीपिकाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या एका चाहत्याच्या साध्याभोळ्या आईला भेटताना दिसत आहे. दीपिकाचं सर्वसामान्य चाहत्यांशी असलेलं साधं आणि नम्र वागणं सर्वांनाच भावलं आहे.
हा व्हिडिओ दीपिकाच्या एका चाहत्याने शेअर केला आहे, ज्याला दीपिकाने एका विशेष 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. या वेळी हा चाहता आपल्या आईलाही सोबत घेऊन आला होता. जेव्हा या चाहत्याच्या आईने दीपिकाला प्रत्यक्ष समोर पाहिले तेव्हा आईने नम्रपणे अभिनेत्रीची भेट घेतली. दीपिकानेही मोठ्या प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा हात हातात घेतला. अभिनेत्रीचा हा नम्र स्वभाव बघून आई चांगल्याच भारावून गेल्या होत्या.
या भेटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या चाहत्याच्या आईने दीपिकासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली 'पुरणपोळी' भेट म्हणून आणली होती. दीपिकाने ही घरगुती भेट अतिशय आनंदाने स्वीकारली आणि त्यांचे आभार मानले. चाहत्याने पोस्टमध्ये लिहिले की, "माझी आई दीपिकाला भेटल्यावर पूर्णपणे स्तब्ध झाली होती. जेव्हा दीपिकाने तिचा हात धरला, तेव्हा ती काहीशी भावुक झाली होती. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे."
हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल झाला असून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "दीपिका खऱ्या अर्थाने एक राणी आहे," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली, तर दुसऱ्याने "हा आतापर्यंतचा सर्वात गोड व्हिडिओ आहे," असे म्हटले. दीपिका पदुकोण सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती लवकरच शाहरुख खानच्या आगामी 'किंग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.