तर मग मोदींचाच बायोपिक हिट झाला असता, 'बॉयकॉट' बॉलिवूड ट्रेंडवर अनुपम खेर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:20 IST2022-08-22T16:02:27+5:302022-08-22T16:20:19+5:30
बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक सिनेमे आपटत आहेत.

तर मग मोदींचाच बायोपिक हिट झाला असता, 'बॉयकॉट' बॉलिवूड ट्रेंडवर अनुपम खेर स्पष्टच बोलले
बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक सिनेमे आपटत आहेत. काही चित्रपट वगळता बाकी सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. काश्मीर फाइल्स, भूल भुलैया 2 आणि गंगूबाई काठियावाडी काही हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. कंगना राणौतचा धाकड, आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा', अक्षय कुमारचा बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन, रणबीर कपूरचा शमशेरा असे अनेक बिग बजेट चित्रपट दणाणून आपटले आहेत. तर दुसरीकडे साउथचा आरआरआर, केजीएफ २, पुष्पा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. याच दरम्यान, सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडचा आर्थिक फटका बॉलिवूडला बसला आहे.
अलीकडेच, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेता अनुपम खेर यांनी काश्मीर फाइल्सच्या हिटपासून बॉयकॉटपर्यंतच्या बॉलिवूडमधील नवीन ट्रेंडवर भाष्य केलं. ते म्हणाले की, चांगली कथा असेल तर लोक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतील. पण जर चित्रपटाची कथा चांगली नसेल आणि त्यात मोठे कलाकार असतील, तरीही तुमचा चित्रपट चालणार नाही. पुढे ते म्हणाले,18 कोटींमध्ये बनलेला कश्मीर फाइल्स हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट आहे, परंतु बिग बजेट चित्रपट फ्लॉप ठरले. कदाचित लोकांना जे बघायचं ते पाहायला मिळतं नाहीय.
मुलाखती दरम्यान त्यांना चित्रपट फ्लॉप होण्यामागे काय कारण असू शकते, तेव्हा ते म्हणाले, कोरोना काळात, प्रेक्षकांनी खूप काही ओटीटी पासून ते इतर देशांचे चित्रपटपर्यंत बरेच काही पाहिलं. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांमध्ये खूप बदल झाला आहे.ते म्हणाले की, आपल्याला असे काही तरी करायचे आहे जे वास्तविक आणि भारतावर केंद्रित असेल, कारण दक्षिणेकडील तिन्ही चित्रपट भारतावर केंद्रित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमोशनमुळे ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सुपरहिट झाल्याच्या प्रश्नावर, अनुपम खेर यांनी सांगितले की, जर हा चित्रपट मोदीजींच्या प्रमोशनने चालला असता तर मोदींच्या जीवनावर आधारित (बायोपिक) तर सर्वात हिट चित्रपट ठरला असता.