मी आराध्यासोबत घरी 'सेलिब्रिटी' नसतो, अभिषेक बच्चन म्हणाला, "हा अजिबातच रिएलिटी चेक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:49 IST2025-03-12T13:47:39+5:302025-03-12T13:49:48+5:30
बच्चन कुटुंबाची एक परंपरा... अभिषेकचा खुलासा

मी आराध्यासोबत घरी 'सेलिब्रिटी' नसतो, अभिषेक बच्चन म्हणाला, "हा अजिबातच रिएलिटी चेक..."
अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना आराध्या ही मुलगी आहे. आराध्या आता १३ वर्षांची झाली आहे. आईसारखीच सुंदर आणि वडिलांसारखीच ती उंच दिसते. आराध्याचे तिच्या शाळेतील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात ती परफॉर्म करताना दिसते. अभिषेक आणि ऐश्वर्याची लाडकी आराध्या (Aaradhya) घरी कशी असते? आई वडिलांना ती सेलिब्रिटीच्या नजरेतून पाहते का? याबद्दल नुकताच अभिषेकने खुलासा केला आहे.
अभिषेकचा लेक आराध्यासोबत कसा आहे बाँड?
अभिषेक बच्चन आगामी 'बी हॅप्पी' सिनेमात डान्सर मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. बालकलाकार इनायत वर्मा सिनेमात त्याची मुलगी आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांनाच आवडला आहे. अभिषेक पहिल्यांदाच दमदार डान्स परफॉर्मन्सही देणार आहे. नुकतंच अभिषेकने त्याच्या भूमिकेबद्दल चर्चा केली. यावेळी त्याने खऱ्या आयुष्यात लेक आराध्यासोबत असलेला बाँड कसा आहे हेही सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "सिनेमात माझ्या भूमिकेला लेकीसाठी त्याच्या कंफर्ट झोनमधून बाहेर जावं लागतं. पण खऱ्या आयुष्यात आराध्याने मला कधीच अशाच परिस्थितीत टाकलं नाही. मला एखादं काम करायचं नाहीए पण आराध्यासाठी मला ते करावं लागेल असं कधीच झालेलं नाही."
तो पुढे हसतच म्हणाला, "सिनेमात माझी मुलगी इनायत मला खडूस समजते. खऱ्या आयुष्यात आराध्या १३ वर्षांची आहे तर तुम्ही समजूच शकता. चांगली गोष्ट ही की घरी तुम्ही फक्त आईवडिलांच्या भूमिकेत असता. प्रोफेशनल किंवा सेलिब्रिटी नसता. हा अजिबातच रिएलिटी चेक नाही उलट हे प्रेम खरंखुरं असतं कारण याचा तुमच्या प्रोफेशनशी संबंध नसतो."
बच्चन कुटुंबाची परंपरा
अभिषेक म्हणाला, "बच्चन कुटुंबाची ही परंपरा चालत आली आहे. मीही माझ्या वडिलांकडून हेच शिकलो आहे. घरी ते माझ्यासाठी फक्त माझे वडील असतात. बाहेर ते अमिताभ बच्चन आहेत. हे खूप चांगलं आहे. यामुळे मला मानसिक संतुलन राखायला मदत मिळाली आहे."