आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा'! 'जेन झी' तरुणांवर आधारित सिनेमात जुनैदची हटके भूमिका
By ऋचा वझे | Updated: February 7, 2025 10:59 IST2025-02-07T10:58:29+5:302025-02-07T10:59:08+5:30
'लव्हयापा' मधला अनुभव, वडील आमिर खान बद्दल काय म्हणाला? जुनैद खानने 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद

आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा'! 'जेन झी' तरुणांवर आधारित सिनेमात जुनैदची हटके भूमिका
आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा (Junaid Khan) 'लव्हयापा' (Loveyapa) हा हिंदी सिनेमा ७ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री खुशी कपूर (Khushi Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. रोमँटिक कॉमेडी असलेला हा सिनेमा 'व्हॅलेंटाईन वीक'च्या पहिल्याच दिवशी रिलीज होत असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अद्वैत चंदन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून बोनी कपूर, आमिर खान आणि सृष्टी बहल आर्या यांनी निर्मिती केली आहे. सिनेमाच्या निमित्ताने जुनैद खानने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला
'लव्हयापा' हा सिनेमा 'लव्ह टूडे' या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. तू तो पाहिला होता का?
हो, मी तमिळ सिनेमा पाहिला होता. लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एक दिवसासाठी एकमेकांचे मोबाईल घेतात ही सिनेमाची संकल्पनाच मला खूप आवडली. त्यामुळे याच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यासाठी मी साहजिकच खूप आतुर होतो. तसंच ही भूमिका माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा खूपच वेगळी होती त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारलं आणि होकार दिला.
सिनेमात तुझं पंजाबी कॅरेक्टर आहे. तू यासाठी काय विशेष तयारी केली?
मी दिग्दर्शकाचं ऐकणारा कलाकार आहे. दिग्दर्शकाच्या नजरेतून त्याला हवं तसं काम करण्यास मी प्राधान्य देतो. तसंच प्रत्यक्ष शूटआधी आम्ही ६ आठवडे रिहर्सल केली होती. त्यामुळे मला ती भूमिका पकडता आली. याशिवाय माझी आई ही पंजाबी कुटुंबातील आहे. आजी आजोबा दिल्लीतच होते. माझे काही भाऊ बहीण दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला तिथल्या भाषेच्या लहेजाचा सराव करता आला. शिवाय सेटवर डायलेक्ट कोचही होताच.
हा सिनेमा 'जेन झी'पिढीवर आधारित आहे. खुशी कपूर याच पिढीतली आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी खुशीला या सिनेमानिमित्ताने पहिल्यांदाच भेटलो. ती जेन झी पिढीतली असली तरी ती सुद्धा माझ्यासारखीच कमी बोलणारी आहे. आम्ही अगदी शहाण्या मुलांसारखं सेटवर असायचो. खुशीची एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे अॅक्शन म्हटल्यावर ती लगेच तिची भूमिका पकडते. तिला अजिबात वेळ लागत नाही. तसंच ती खूप प्रोफेशनल आहे त्यामुळे मला तिच्यासोबत काम करणं खूप सोपं गेलं. आम्हाला खूप मजा आली.
तुझं कोणत्या पिढीतील लोकांशी जास्त जमतं? तसंच तू सोशल मीडियावर का नाहीस?
(हसतच) माझं तर जुन्या पिढीतल्या लोकांसोबतच जास्त जमतं. या पिढीचा असलो तरी मला जुन्या काळातच रमायला आवडतं. म्हणूनच मी सोशल मीडियाकडेही आकर्षित झालो नाही. सिनेमाच्या निमित्ताने मला खुशीनेच इन्स्टाग्राम, आणि इतर अॅप मधल्या गोष्टी शिकवल्या. पण माझा सोशल मीडिया अकाऊंट सुरु करण्याचा काही विचार नाही.
आमिर खानचा मुलगा अशी तुझी ओळख आहे. याबद्दल काय वाटतं. सिनेमा निवडताना आमिरचा सल्ला घेतोस का?
जर मला काहीतरी विशिष्ट प्रश्न पडला असेल तरच मी त्यांना विचारतो. साध्या गोष्टी विचारत नाही. तसंही ते ४० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेच. आमिर खानचा मुलगा अशी माझी ओळख आहे. यावर मला एकच वाटतं की प्रेक्षकांसोबत नातं बनवण्यासाठी वेळ लागतो. एक-दोन सिनेमात ते होत नाही. त्यासाठी सतत काम करत राहावं लागतं. आज त्यांची ४० वर्षांनंतर आमिर खान ही ओळख आहे. त्यामुळे मला वेगळी ओळख बनवण्यासाठी वेळ लागणारच.
तुझ्या आयुष्यातल्या 'लव्हयापा' बद्दल काय सांगशील? तुझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत?
जसं मी सांगितलं की मी खूप जुन्या विचारांचा आहे. जास्त सोशल होत नाही. मला नात्यात विश्वास, एकमेकांमधला संवाद, सेन्स ऑफ ह्युमर या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात. ते मिळालं तर चांगलंच आहे. प्रेम, लग्न यावर माझा नक्कीच विश्वास आहे.