'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर आमिरने घेतला ब्रेक; नवीन लूक पाहून चाहते चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:35 IST2022-11-14T20:35:13+5:302022-11-14T20:35:38+5:30
आमिर खान दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पोहोचला, यावेळी त्याचा लूक पाहून चाहते चकीत झाले.

'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर आमिरने घेतला ब्रेक; नवीन लूक पाहून चाहते चकीत...
Aamir Khan:आमिर खान त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटामुळे सतत चर्चेत होता. चित्रपटाला चाहत्यांकडून बहिष्काराचा सामना करावा लागला आणि यामुळेच बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आमिर क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. दरम्यान, त्याने दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली.
आमिरच्या बालपणीच्या मित्राने दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये आमिरने हजेरी लावली. यावेळी आमिरने एका चॅट सेशनमध्ये चित्रपट कारकिर्दीसह खासगी आयुष्यावरही भाष्य केले. यावेळी तो पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसला. आमिरचा ग्रे लूक पाहून चाहतेही चकीत झाले. यावेळी त्याने अभिनयापासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले.
काय म्हणाला आमिर?
यावेळी आमिर म्हणाला, “जेव्हा मी एक अभिनेता म्हणून चित्रपट करतो तेव्हा मी त्यात पूर्णपणे हरवून जातो. त्यावेळी मला माझ्या आयुष्यात दुसरे काहीही दिसत नाही. लाल सिंग चड्ढा नंतर मी चॅम्पियन्स नावाचा चित्रपट करतोय. या चित्रपटाची गोष्ट अप्रतिम आणि मनाला भिडणारी आहे. पण, त्यात अभिनेता नसेल, मी सध्या अभिनयापासून ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे."
दीड वर्षे अभिनयातून ब्रेक
आमिर पुढे म्हणाला, ''मी 35 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि माझे पूर्ण लक्ष माझ्या कामावर आहे. पण, मला वाटते की माझ्या जवळच्या लोकांसाठी हे चांगले नाही. हीच ती वेळ आहे, जेव्हा मी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. मी पुढचे दीड वर्षे अभिनेता म्हणून काम करणार नाही. पण, या काळात निर्माता म्हणून कायम राहणार आहे.'' आमिर सध्या 'चॅम्पियन्स' नावाच्या चित्रपटाची निर्मीती करतोय. याशिवाय, तो 'सलाम वेंकी' या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.